वयाच्या 58 व्या वर्षी सिद्धू मूसेवालाची आई गरोदर, ‘या’ तंत्रज्ञानामुळे देणार बाळाला जन्म
मुंबई : दिवंगत गायक सिद्धू मुसेवाला याची आई वयाच्या 58 व्या वर्षी बाळाला जन्म देणार आहे. पुढच्या महिन्यात सिद्धू मुसेवालाची आई दुसऱ्यांदा आई होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने मुसेवालाची आई बाळाला जन्म देणार आहे. पण यावर सिद्धू मुसेवाला याच्या आई – वडिलांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सांगायचं झालं तर, सिद्धू त्याच्या आई-वडिलांचा एकूलताएक मुलगा होता. 2022 मध्ये सिद्धू याची हत्या करण्यात आली. गायकाच्या हत्येची जबाबदारी लॉरेंस बिश्नोई याने स्वीकारली. दरम्यान, सिद्धू याच्या आईच्या प्रेग्नेंसीची बातमी समोर येताच चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. वयाच्या पन्नाशीत महिला आयव्हीएफच्या (IVF) मदतीने गरोदर राहू शकतात का? असा प्रश्न आता याठिकाणी उपस्थित राहत आहे. जर वयाच्या पन्नाशीत महिला गरोदर राहिल्या तर त्यांच्या जीवाला कोणता धोका निर्माण होऊ शकतो का? असे प्रश्न देखील उपस्थित राहत आहेत.
IVF म्हणजे विट्री फर्टिलायझेशन.. याला टेस्ट ट्यूब बेबी देखील म्हणलं जातं. या तंत्रात स्त्रीच्या अंडाशयातून अंडी काढून फेलोपियन ट्यूबमध्ये पुरुषाच्या शुक्राणूसह फलित केलं जातं. त्यानंतर गर्भाधानाद्वारे तयार झालेला गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात ठेवला जातो. ज्या महिला नैसर्गिकरित्या आई होऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरलं आहे.
पन्नाशीनंतर नैसर्गिकरित्या गरोदर राहणं महिलांना शक्य नसतं. कारण या वयोगटात महिलांची मासिक पाळी बंद होण्याच्या मार्गावर असते. पण IVF च्या मदतीने महिला गरोदर राहू शकतात. यासाठी महिलांना हार्मोनल इंजेक्शन देऊन त्यांचे गर्भाशय पुन्हा कार्यरत केलं जातं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार IVF ची मदत घेण्याआधी महिलांनी संपूर्ण शारीराची चाचणी करुन घेणं महत्त्वाचं असतं. यामुळे महिलेला कोणता आजार तर नाहीना याची माहिती मिळते. ज्यामुळे महिलेच्या गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय, अंडाशय आणि गर्भाशयासह सर्व पुनरुत्पादक अवयवांची देखील तपासणी केली पाहिजे. यामध्ये अंडाशयातील ग्रंथी आणि गर्भाशयाचे आरोग्य महत्त्वाचे आहे. या प्रकरणात अगदी किरकोळ अडचण देखील स्त्रीसाठी धोकादायक ठरू शकते.
मधुमेह, बीपी आणि रक्ताच्या तपासण्याही कराव्यात. याशिवाय, महिलेला तिच्या मागील गर्भधारणेदरम्यान कोणतीही अडचण, गर्भपात झाला आहे का… याची माहिती असणे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. महिला फक्त शारीरिक नाही तर मानसिकदृष्ट्या देखील तयार असायला हव्यात. IVF दरम्यान उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितींबाबत स्त्रीने प्रजनन तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा केली पाहिजे. ज्यामुळे धोका टळू शकतो.