कुठे नेऊन ठेवलंय अहमदनगर ?
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात विकासाच्या दृष्टिने
अनेक गोष्टी महत्वाच्या असताना त्याकडे लक्ष देण्याचे सोडून अहमदनगरचे नामांतरण
आणि विभाजनाचा घाट घातला जातोय हे कितपत योग्य आहे? 533 वर्षापूर्वी स्थापन झालेले अहमदनगर शहर हे विकासाबाबत आजही
इतर शहरांपेक्षा खूपच मागे आहे हे वास्तव आहे.
अहमदनगरमध्ये विकासाला चालना देणे गरजेचे असून
तसे न करता वेगवेगळ्या मुद्दयांवरून या अहमदनगरला डिवचले जाते. महाराष्ट्रात अहमदनगर शहरासह जिल्हा नेहमीच या ना त्या कारणाने
चर्चेत येत असतो. अहमदनगरमध्ये सातत्याने काही ना काही घडामोडी घडतच आहेत. अलीकडील
काळात तर या अहमदनगरला अनेकांनी बदनाम केलय. राजकारणी असो किंवा गुन्हेगारी
प्रवृत्तीची लोकं असो, यांच्यामुळे सध्या
अहमदनगरचे नाव महाराष्ट्रभर ढवळून निघत आहे.
एकेकाळी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारताबाहेर
नावलौकीक मिळवलेल्या अहमदनगरची आज काय अवस्था झाली आहे. ‘कुठे नेऊन ठेवलंय अहमदनगर‘ ? असे म्हणण्याची
वेळ आज आली आहे. ऊठसूठ कोणीही या अहमदनगरवर अधिकार गाजवत आहे. येथे कोणालाच कुणाचा धाक राहिलेला नाही, येथील नागरिकांना
कायद्याचा विसर पडला आहे की काय ? असाही प्रश्न पडत आहे. विकासाच्या बाबतीत खूपच मागे असलेले अहमदनगर हे सदयस्थितीत गुन्हेगारी,
बेकारी, बेरोजगारी, एकमेकांवर आरोप
प्रत्यारोपांच्या फैरी झाडणे यांतच अहमदनगर अग्रेसर असल्याचे पाहायला मिळत आहे. पण याला जबाबदार कोण ? याचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे, अहमदनगर मधील चालू घडामोडीसाठी कारणीभूत कोण ठरत आहे. यासाठी प्रत्येकाने
स्वत: आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.
अहमदनगर शहरासह जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत मोठ
योगदान आहे. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राबरोबरच राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सांस्कृतिक,
अध्यात्मिक जडणघडणीत अहमदनगरच्या अनेक मंडळींचा
मोठा सहभाग आहे. सध्या तर महाराष्ट्राचे राजकारण अहमदनगर शहर
आणि जिल्ह्याभोवती फिरत आहे. विकासाच्या दृष्टिने अत्यंत महत्वाचे असलेले
अहमदनगरचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. ते सोडवणे गरजेचे आहे. उच्च शिक्षणाच्या
सुविधा, रोजगाराचा प्रश्न,
औदयोगिक कंपन्यांचा अभाव, नोकरीची समस्या, त्यातून निर्माण होणारी बेरोजगारी बेकारी, वाढती गुन्हेगारी याबाबत अहमदनगरकडे लक्ष
दयायला कोणालाच वेळ नाही की याकडे जाणूनबुजून
दुर्लक्ष केले जात आहे हे काही समजत नाही. त्यामुळे आता ‘कुठे नेऊन ठेवलंय अहमदनगर‘ ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून
गैरप्रकार घडत आहे पण यावरून खरा प्रश्न असा उपस्थित होतो की, अहमदनगरच्या विकासाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत कोणी आवाज उठवू नये, याकडे कोणाचे लक्ष
जावू नये यासाठी लक्ष विचलित करण्यासाठी या अहमदनगरमध्ये होत असलेले विविध गैरप्रकार
गैरघटना मुद्दाम घडवून तर आणले जात नाही ना ? की जेणेकरून सर्वजण विकासकामाबाबत
बोलण्यापेक्षा शहरात घडणाऱ्या घटनांबाबतच चर्चा करत राहतील.. तिकडेच जास्त लक्ष
देतील या हेतूने कोणीतरी अशा गैरघटना घडवून आणत असावे,
त्यातच आता अहमदनगरचे नामांतरण विभाजन करण्याचा विषय चांगलाच गाजत आहे,यावरून
अनेक मतमतांतर आहे, यावरून अहमदनगर मध्ये अनेक वादही उफाळून येत आहे. यावरून जातीय
धार्मिक तेढ देखील निर्माण होत आहे. हे थांबणे गरजेचे आहे. खरं तर या अहमदनगरच्या विकासासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या
आहे. त्याकडे लक्ष देणे सोडून या अहमदनगरचे नामांतरण करण्याचे खुळ डोक्यात घेणं
खरंच इतक महत्वाचे आहे का? तसेच अहमदनगरच्या विकासाबाबत
चर्चा करणे सोडून इथे सध्या फक्त जाती धर्माबाबत चर्चा होते जाती धर्माच्या नावाखाली
वादविवाद, हाणामाच्या, जीवघेणे हल्ले, जाळपोळ, अवैध धंदे अशाच घटना मोठ्या प्रमाणात होत
असल्याने खरंच ‘कुठे नेऊन ठेवलंय अहमदनगर‘ ? असा प्रश्न निर्माण होत आहे,
अहमदनगरच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व
देण्याऐवजी इथे तर जाती धर्मालाच महत्त्व दिले जात आहे इतकचं नव्हे तर जाती
धर्मासाठी धार्मिक स्थळांवरही हल्ले केले जात आहे. स्वतःचे जाती धर्म किती श्रेष्ठ
हे सांगण्याची, पटवून देण्याची जणू काही या अहमदनगर मध्ये स्पर्धाच लागली आहे असे चित्र पाहायला मिळत आहे. खरंच
या गोष्टींना इतक महत्व देण गरजेचे आहे का ? अहमदनगरमध्ये जाती
धर्माचा वाद इतका पेटत चाललाय की यामुळे आता अहमदनगरचे थेट नावच बदलण्याचा प्रकार
सुरू आहे. तर, हे कमी आहे की
काय ? म्हणून अहमदनगरच्या नामांतरणा बरोबरच आता या
अहमदनगरचे तुकडे करण्याचा म्हणजेच विभाजन करण्याचा विचार उच्च स्तरावर चालू आहे.
यावरून पुन्हा नवा वाद उफाळून येणार हे मात्र नक्की.. खरंच ‘कुठे नेऊन ठेवलंय अहमदनगर‘ ?
एकीकडे प्रशासकीय कामकाजासाठी विभाजन होत असले तरी यामुळे आरोप–प्रत्यारोप, विरोध–समर्थन यातून आंदोलन, मोर्चे, वादविवाद, हाणामाऱ्या असे गैरप्रकार घडतच राहणार यात तीळमात्र शंका
नाही, त्यातच या अशा सर्व
प्रकारात भरडला जातो तो म्हणजे सर्व सामान्य नागरिक आणि पोलिस विभाग, सर्व सामान्य नागरिकांना या घटनेमुळे अनेक
समस्यांना सामोरे जावे लागते तर अहमदनगर मध्ये सध्या घडणा-या घटनांमुळे पोलीस
प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणताना एकीकडे नागरिकांचा
रोष आणि वरिष्ठांचा दबाव अशा द्विधा मनस्थितीत पोलीसांना आपली
भूमिका पार पाडताना नाकीनऊ येते,
एकेकाळी सहकार क्षेत्राबरोबरच राजकारण, समाजकारण, अर्थकारण,
सांस्कृतिक, अध्यात्मिक अशा क्षेत्रात नावाजलेले अहमदनगर आज सर्वत्र गाजत आहे ते फक्त गुन्हेगारी,
विकासाची अधोगती, जातीय वाद, धार्मिक वाद, अशा विषयांमुळे…. या अहमदनगरचे चित्र कधी बदलणार ? नगरचा सर्वागीण विकास केव्हा होणार ? नगरकर केव्हा सुधारणार ? येथील विविध प्रश्न केव्हा मार्गी लागणार ? की हे सगळं असचं घडत राहणार ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून या
अहमदनगरच्या सदय स्थितीवरून पुन्हा एकच म्हणावेसे वाटते, ‘अरे, कुठे नेऊन ठेवलंय अहमदनगर ?
संपादक : आफताब
शेख