संपादकीय… अहमदनगर : शेवगाव मधील मिरवणुकीत पोलीस बंदोबस्त नेमका कोणासाठी होता?
समाजकंटकांना दंगल दगडफेक करता यावी यासाठी पोलिसांनी बंदोबस्त केला होता का?
पोलिसांसमोर सगळा प्रकार घडत होता तरीही पोलिसांनी वर्दीचा वापर करणे का टाळले?
दगडफेक दंगल करणारे समाजकंटक शेवगावच्या बाहेरचे होते का?
समाजकंटक दगड घेऊनच पुर्व तयारीने मिरवणुकीत सहभागी झाले होते का?
शेवगाव मध्ये घटना घडणार हे पोलिसांना आधीच माहित होते का?
सुफी संतांची पावनभूमी अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्याला अनेक महापुरुषांचाही वारसा लाभलेला आहे. याच महापुरुषांची समाजाला आठवण राहावी. त्यांचे कार्य, विचार, जीवन संघर्ष, पराक्रम आजच्या पिढीला माहिती व्हावे, ते समाजापर्यंत पोहचावे, सर्वांसाठी प्रेरणादायी ठरावे, त्यांचे अनुकरण केले जावे यासाठी अशा थोर महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करत यानिमित्ताने मिरवणूक काढण्यात येते आणि या मिरवणुकीत सर्वजाती धर्माचे लोकं यात सहभागी होत असल्याचे चित्र पाहायला मिळायचे, मात्र हे चित्र सध्या बदलत चालल्याचे दिसून येत आहे, कारण महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रमाला किंवा त्या निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला गालबोट लागत असल्याचे प्रकार सध्या घडत असून त्यातून जातीय तेढ निर्माण होत आहे, आणि यामुळे समाजासमाजात दुरावा निर्माण होऊन एकमेकांबद्दल द्वेष पसरत असल्याचे चित्र सध्या आपल्याला या अहमदनगर जिल्ह्यात पहायला मिळत आहे,
जाती धर्माच्या नावाखाली एकमेकांत वाद घालण्याचे प्रकार तर होतातच, पण यात धार्मिक स्थळांवर देखील रोष व्यक्त केला जात असल्याचा लाजिरवाणा प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडत आहे, अशाच प्रकारची घटना नुकतीच काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात घडली आहे, छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सर्वत्र धामधूमपणे साजरी होत होती, जयंतीनिमित्त शेवगाव तालुक्यात मिरवणूक काढण्यात आली होती आणि नेमकं जे घडायला नको होते, तेच या मिरवणुकीत घडले, आणि या जयंती उत्सवावर मोठं विरजण पडलं,
शेवगाव मध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही समाजकंटकांनी धर्माच्या नावाने घोषणा दिल्या त्यात काही आक्षेपार्ह घोषणांचाही समावेश होता, या घोषणाबाजीमुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, यातून समाजासमाजात विशेषतः हिंदू मुस्लिम लोकांच्या वादात मोठी ठिणगी पडली या वादाचे रूपांतर थेट दगडफेकीत झाले, यावेळी मोठी दंगल उसळली आणि येथील वातावरणच पूर्ण बदलून गेले, मिरवणुकीदरम्यान काही समाजकंटकांनी धार्मिक स्थळाजवळ आक्षेपार्ह घोषणा दिल्याने दोन गटात तणाव निर्माण झाला, दोन्ही गटाच्या लोकांनी एकमेकांवर तुफान दगडफेक करत राडा घातला, वाहनांची दुकानांची तोडफोड करत मोठं नुकसान केले, आणि यामुळे येथील शांतता भंग झाली,
महत्वाचे म्हणजे या मिरवणुकी दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता मग असं असताना गैरकृत्य गैरघटना कशी काय घडली ? यावेळी पोलिस बंदोबस्त फक्त नावालाच होता का ? पोलिसांसमोर हा प्रकार घडतोय आणि पोलिस काहीच करत नाही, म्हणजे याचा अर्थ ही घटना घडणार हे पोलिसांना माहिती होते का ? की राजकीय दबावामुळे पोलिसांनी यावेळी आपल्या वर्दीचा वापर केला नसावा ? तसेच ही दगडफेक दंगल नियोजन पद्धतीने झाली असावी का ? दगडफेक करणारे समाजकंटक यांना मिरवणूक मार्गावर दगड कोठे सापडले ? की हे समाजकंटक दगड घेऊनच पूर्व तयारीने या मिरवणुकीत सहभागी झाले होते ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे,
तसेच जिथे घटना घडली त्या शेवगाव तालुक्यात सर्व धर्मीय समभाव असा विचार सर्वजण करत सामाजिक एकोपा, जातीय सलोखा आजपर्यंत येथे टिकून होता, येथील नागरिकांनी कधीच हिंदू मुस्लिम किंवा कोणताही जातीय भेदभाव, द्वेष केला नाही, मग या ठिकाणी जातीय दंगल कोणी घडवून आणली, या दगडफेकीस नेमके कोण जबाबदार आहे ? या मिरवणुकीत शेवगावच्या बाहेरचे कोणी सहभागी झाले होते का ? हाही एक प्रश्न आहे.
या शेवगाव मध्ये हिंदू मुस्लिम तसेच सर्व जाती धर्माचे लोक सर्वधर्म समभावाने गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते आणि हेच कोणाला तरी पाहवत नसेल म्हणूनच तर त्यांनी कट कारस्थान करत दगडफेक दंगल करत सामाजिक धार्मिक दरी निर्माण करत स्वार्थासाठी तरुणांना हाताशी धरून त्यांची माथी भडकवत शेवगाव मध्ये होत्याचं न्हवतं करून ठेवले. या सर्व विचित्र प्रकारामुळे येथील शांतता तर भंग झालीच पण याचबरोबर सर्व सामान्य नागरिक भयभीत झाले, व्यापारी वर्गाचे मोठं नुकसान झाले,
तसेच या प्रकरणी पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले काहींना अटक केली, पण यात खरे गुन्हेगार कोण आणि खोटे गुन्हेगार कोण ? हा देखील प्रश्न आहे, त्यातच ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले किंवा अटक झाली अशांचे आयुष्य बदनाम झाले तर काहींना यात विनाकारण यात अडकवले गेल्याने ते आणि त्यांचे कुटुंबीय बदनाम झाल्याचा प्रकार या शेवगाव मध्ये घडलाय,
खरं पाहिलं तर ज्या वेळी घटना घडली त्यावेळी पोलीस तेथेच हजर होते त्यांनी जर त्यावेळी खाकी वर्दीचा धाक दाखवला असता आणि परिस्थिती आटोक्यात आणली असती तर दगडफेक झालीच नसती, दंगल पेटलीच नसती आणि हे प्रकरण इतकं वाढलेच नसते, त्यामुळे या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहे, घटना घडल्यावर कारवाई करण्यापेक्षा घटना घडू नये किंवा तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असताना पोलिसांनी तसे न केल्यामुळे पोलीसांच्या कार्यावर संशय घेतला जात आहे, पोलिस मिरवणुकीत बंदोबस्तात असतानाही अशा घटना घडतात म्हणजे पोलिस यावेळी बघ्याची भूमिका घेत होते का ? त्यांनी वेळीच का नाही रोखलं का नाही कारवाई केली, पोलिसांचा बंदोबस्त नेमका कोणासाठी होता ? अनुचित घटना, गैरप्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त केला होता की समाजकंटकांना दंगल दगडफेक करता यावी यासाठी पोलिसांनी बंदोबस्त केला होता हा प्रश्न पडतो,
अहमदनगर जिल्ह्यात हे असे प्रकार किती दिवस चालणार, याला कोण जबाबदार, अशा घटनांना कधी आळा बसणार, हे कोण रोखणार , हे सगळं कधी थांबणार ? हे समजणे खूपच अवघड होत आहे..
संपादक : आफताब शेख