कृष्णराज लव्हेकर यांनी घडविले ख्याल गायकीचे विस्तृत दर्शन
संगीत साधना मंच ची मासिक संगीत सभा
अंबाजोगाई – संगीत साधना मंचच्या वतीने आयोजित अंबाजोगाईत नुकत्याच झालेल्या तृतीय मासिक संगीत सभेत परभणी येथील प्रख्यात गायक कृष्णराज लव्हेकर यांनी प्रारंभी राग मुलतानी मधील विलंबित ख्यालाचे सादरीकरण केले. मेवाती घराण्याची मिळालेली तालीम त्यांच्या गायनातून प्रसन्न चित्ताने प्रकट होत होती. ख्याल गायकीचे संपूर्ण विस्तृत दर्शन मुलतानी रागाच्या माध्यमातून रसिकांना घडविले. त्यानंतर लव्हेकर यांनी राग शंकरा मधील मध्य लय तीन तालातील सुरेख बंदिश सादर केली. तसेच मर्मबंधातली ठेव हे नाट्यगीत आणि शतजन्म शोधताना हे पद गावुन संगीत सभेचा समारोप केला.
रत्नदीप शिगे यांनी तबल्यावर तर संवादिनीवर मातृस्वर संगीत विद्यालयाचे संचालक विश्वजीत धाट यांनी साथ संगत केली.
स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृहात झालेल्या संगीत सभेसाठी शहरातील संगीत साधक,पालक,रसिक महिला,नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.