राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्याकडून राजेसाहेब देशमुख यांच्या कार्याची दखल
महाविकास आघाडीकडून राजेसाहेब देशमुख यांचे नांव आघाडीवर
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. नेत्यांच्या गाठीभेटी, सभा, दौरे यांना वेग आला आहे. अशातच आज बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे गुरूवार, दिनांक १२ सप्टेंबर रोजी खा.शरदचंद्र पवार यांच्या भेटीला सिल्वर ओकवर दाखल झाले. या भेटीनंतर राजेसाहेब देशमुख यांनी या भेटीत काय घडलं याबाबतची माहिती दिली आहे. खा.पवारांच्या भेटीवेळी परळी विधानसभा मतदारसंघाचे अनुषंगाने चर्चा झाली. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. काँग्रेसला ही जागा मिळावी अशी आम्हाला अपेक्षा राहील. खा.शरदचंद्र पवार हे मोठ्या मनाचे ज्येष्ठ नेते आहेत याबाबत सकारात्मक विचार करतील अशी अपेक्षा आहे असे राजेसाहेब देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
मुंबई येथे गुरूवार, दिनांक १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांनी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या सातत्यपूर्ण प्रभावी कामगिरी व कार्याची दखल घेतली. यावेळी बीड जिल्ह्यासह परळी विधानसभा मतदारसंघाचा आढावा आणि अहवाल जाणून घेतला. आपण आदरणीय पवार साहेबांची सदिच्छा भेट घेवून त्यांचे आशिर्वाद घेतले अशी माहिती देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. महाविकास आघाडीकडून देशमुख यांचे नांव सध्या आघाडीवर आहे. याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे म्हणाले की, गुरूवार, दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथील सिल्व्हर ओक येथे देशातील ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार साहेबांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पवार साहेबांनी बीड जिल्ह्यातील यावर्षीच्या पावसाची सद्यस्थिती, पिण्याच्या पाण्याची व गुरांसाठी चाऱ्याची उपलब्धता, शेतातील पिकांची सद्यस्थिती यांची माहिती घेतली. तसेच बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, ऊसतोड मजूर, कामगार, महिला, श्रमजीवी वर्ग, शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले. सोबतच राज्यातील बदलत्या राजकीय समिकरणाचे बीड जिल्ह्याच्या राजकारण आणि समाजकारणावर काय परिणाम होतील. तसेच बीड जिल्ह्यासह परळी विधानसभा मतदारसंघातील राजकीय स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. मागील अनेक वर्षांपासून परळी विधानसभा मतदारसंघात सातत्यपूर्ण कामगिरी करून प्रभावी जनसंपर्क ठेवणाऱ्या जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्या कार्याची दखल घेऊन सविस्तर कार्य अहवाल आणि आढावा घेतला. मागील काही दिवसांपासून जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांचे नांव परळी विधानसभा मतदारसंघातून एक सक्षम उमेदवार म्हणून आघाडीवर आहे. मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य माणसाची ही तशीच अपेक्षा आहे. यावेळी खा.पवार साहेब यांनी ही विस्तृत माहिती घेत, सकारात्मक चर्चा केली. आम्हाला भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन आणि अनेक मौलिक सूचना ही केल्या. यावेळी मी, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, शंभुराजे देशमुख यांची उपस्थिती होती. अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी दिली आहे. देशमुख यांनी परळी विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या आग्रहामुळेच देशमुख यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केलं आहे. याच अनुषंगाने परळी विधानसभा मतदारसंघात बैठका घेत ते जनतेशी सातत्याने थेट संवाद साधत आहेत. तसेच मनोजदादा जरांगे पाटील यांची ही राजेसाहेब देशमुख यांनी मागील काही दिवसांपासून सातत्यपूर्ण भेट घेतली आहे हे विशेष होय.