अहमदनगर : गुणवत्तेपुढे कोणतीही परिस्थिती आडवी येत नाही -इंजि. शकील अहमद
पी.ए. इनामदार स्कूलमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनात चमकण्यासाठी शैक्षणिक गुणवत्तेशिवाय पर्याय नाही. गुणवत्तेपुढे कोणतीही परिस्थिती आडवी येत नाही, ज्ञानाने प्रकाशमान होऊन जीवनातील ध्येय विद्यार्थ्यांना गाठता येणार असल्याचे प्रतिपादन इंजि. शकील अहमद यांनी केले.
इकरा एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार स्कूलमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था), एमआयटी, जेईई, नीट आदी स्पर्धा परीक्षेवर करियर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना इंजि. शकील अहमद बोलत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन अब्दुल रहिम खोकर, व्हाईस चेअरमन इंजि. इकबाल सय्यद, प्राचार्य हारुन खान, उपप्राचार्या फरहाना शेख आदींसह विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.
पुढे इंजि. शकील अहमद म्हणाले की, स्वत:मध्ये जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास निर्माण केल्यास कोणतीही परीक्षा अशक्य नाही. स्पर्धा परीक्षेत आलेल्या अपयशाने खचून न जाता, सातत्य ठेऊन योग्य दिशेने वाटचाल करणे हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले. तर स्पर्धा परीक्षेतील विविध संधीची माहिती व अभ्यास करण्याचे पध्दतीची माहिती देऊन, जेईई, नीट परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी कोट्यातून इंजीनियरिंग व मेडिकलसाठी नंबर लागलेल्या गरजू विद्यार्थ्याचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्याचे त्यांनी जाहीर केले.
संस्थेचे चेअरमन अब्दुल रहिम खोकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्राचार्य हारुन खान यांनी अल्पसंख्यांक समाजातील मुले शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत असल्याने गुणवत्ता असून सुध्दा ते मागे पडत आहे. या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत उतरुन आपले भवितव्य घडवून समाजाचे नाव उंचावण्याचे त्यांनी सांगितले. या व्याख्यानाला दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमैय्या शेख यांनी केले. आभार फरहाना शेख यांनी मानले.