नवी दिल्ली | वृत्तसंस्था –
संपूर्ण भारतीयांचे लक्ष लागून असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था च्या चांद्रयान -३ ने आज (१४ जुलै) दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी आंध्र प्रदेशच्या श्री हरिकोट येथील सतीश धवन आंतरिक्ष केंद्रातून अवकाशात यशस्वीरित्या झेप घेतली.
चांद्रयान-३ इस्रोच्या विश्वासनीय रॉकेट एलवीएममार्फत प्रक्षेपित केले गेले आहे. इस्रोने आतापर्यंत अनेक मोहिमा हाती घेतल्या आहेत. यात मंगलयान, चांद्रयान -१, चांद्रयान -२ आणि चांद्रयान -३ यांचा समावेश आहे. जवळपास ४ वर्षांपूर्वी विश्वासनीय रॉकेट एलवीएममार्फत चांद्रयान -२ प्रक्षेपित करण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान -२ व्यवस्थित उतरु शकले नाही. त्यामुळे ही मोहीम त्यावेळी अयशस्वी ठरली होती. त्यानंतर आज चांद्रयान -३ ने अवकाशात झेप घेतली असून चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरणार आहे.
तसेच चंद्रावर जात असलेले इस्त्रोचे चांद्रयान -३ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. आतापर्यंत या ठिकाणी कुठलेही यान पोहोचलेले नाही. त्यामुळे संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ भारताच्या चांद्रयान -३ मोहीमेवर लक्ष ठेवून आहेत. चांद्रयान -२ मध्ये अपयश मिळाल्यानंतर भारताचा हा दुसरा प्रयत्न आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास भारत तंत्रज्ञानात किती पुढे आहे हे दाखवून देण्याची एक मोठी संधी मिळणार आहे.
दरम्यान, चांद्रयान-३ तयार करण्यासाठी सुमारे ६१५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. चांद्रयान -२ च्या तुलनेने चांद्रयान -३ मोहिमेसाठी कमी खर्च आला आहे. चांद्रयान -३ मोहिमेच्या माध्यमातून फक्त लँडर आणि रोव्हर हे अवकाशात पाठवले गेले आहेत. तर यापूर्वी इस्रोने प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान -२ च्या ऑर्बिटरचा वापर चांद्रयान -३ मोहिमेत करण्यात येणार आहे. त्यामुळे चांद्रयान -३ मध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही. यापूर्वी चांद्रयान -२ मोहिमेसाठी ९६० कोटी रुपये खर्च आला होता. पंरतु, चांद्रयान -३ मोहिमेचा खर्च मागच्या मोहिमेपेक्षा कमी आल्याचे दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदनपर ट्वीट!
चांद्रयान ३ नं भारताच्या अवकाश कार्यक्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला आहे. प्रत्येक भारतीयाची स्वप्नं पूर्ण करणारी ही कामगिरी आहे. ही कामगिरी म्हणजे आपल्या वैज्ञानिकांच्या निष्ठेचीच साक्ष आहे – नरेंद्र मोदी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं अभिनंदन!
चांद्रयान-३ मोहिम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल,’असा विश्वास व्यक्त करून चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. चांद्रयान-३ ही मोहिम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचे प्रतिक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रात देखील भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चांद्रयान-३ मोहिम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्वपूर्ण अशी आहे. यातून पुढे अनेक वैज्ञानिक, संशोधन प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्वास आहे. या मोहिमेसाठी भारत सरकारने आपल्या वैज्ञानिकांना सातत्यपूर्ण असे पाठबळ आणि प्रोत्साहन दिले आहे. आपल्या तरूण वैज्ञानिकांसाठी हा क्षण प्रेरणादायी आहे. भारतीयांच्या अवकाशातील या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे,असेही यावेळी नमूद केले.