मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंड करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तसंच अजित पवार यांनी राष्ट्रवादी या पक्षावरही दावा सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत उभी फूट पडलेली असताना आज नाट्यमयरित्या अजित पवार यांच्यासोबत राज्य मंत्रिमंडळात शपथ घेतलेले अनेक मंत्री शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे दाखल झाले आहेत.
यामध्ये स्वत: अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ या मंत्र्यांचा आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचाही समावेश आहे. अजित पवार गटाचे मंत्री शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल होताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हेदेखील पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आयोजित केलेली बैठक अर्धवट सोडून वाय. बी. चव्हाण सेंटरकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन गटांच्या मनोमिलनासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरोधी बाकावरील जवळपास ४० आमदार सत्ताधाऱ्यांना सामील झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी उसळलेल्या जातीय दंगली, शेतकऱ्यांवर ओढवलेले दुबार पेरणचे संकट कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, मंत्र्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आदी अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची आयती संधी असताना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे विरोधकांचे संख्याबळ घटले आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात विरोधकांची कसोटी लागण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.