जुन्या महापालिकेजवळ कारवाई ; दोघांवर गुन्हा दाखल
अहमदनगर – दुचाकीच्या डिक्कीत तलवार व कोयता बाळगणाऱ्या दोन जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जुन्या महापालिकेजवळून दि.१५ जुलै २०२३ रोजी कोतवाली पोलीसांनी दोन जणांना सापळा लावून ताब्यात घेतले. ईशान सलीम शेख (वय १९ वर्ष, रा. कोटला घासगल्ली, अहमदनगर), उदय हमीद खान (वय २० वर्षे, जमजम हॉटेल शेजारी पंचपीर चावडी, अहमदनगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
जुन्या महानगरपालीकेजवळ दोन जण दुचाकीच्या डिक्कीत एक तलवार व एक कोयता बाळगुन गुन्हा करण्याच्या बेतात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक यादव यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने जुन्या महापालिकेजवळ सापळा लावून दुचाकीवरून येत असलेल्या संशयीत दोघांना अडवून चौकशी केली. त्यांची झडती घेतली असता एक तलवार व कोयता आढळून आल्याने दोघांना त्याब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात हजर केले. तलवार व कोयता कोणाकडून व कोणत्या कामासाठी बाळगून असल्याचे विचारले असता दोन्ही शस्त्र त्यांचीच असल्याचे कबुली दिली आहे. पोलीस शिपाई अतुल केशव काजळे यांच्या फिर्यादीवरुन भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सलीम शेख तपास करत आहेत.
पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, सलिम शेख, अमोल गाढे, संदिप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, सागर मिसाळ, अतुल काजळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
……………………………………….
दादागिरी खपवून घेणार नाही : पीआय चंद्रशेखर यादव
सर्वसामान्य नागरिकांमध्ये शस्त्राच्या धाकावर दहशत पसरविण्यासाठी जवळ कोयता व तलवार बाळगणाऱ्या दोघांवर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनाकारण कोणी त्रास देत असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे. सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.