संपादकीय…अहमदनगर : गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी फक्त पोलीसांचीच का?
अहमदनगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुन्हेगारी बाबतीत अहमदनगर शहर व जिल्हा संवेदनशील बनलाय. या नगर शहरात तर दररोज काही ना काही बेकायदेशीर घटना घडत आहे. यात वाद-विवाद, त्यातून हाणामारी, जीवघेणे हल्ले, खून, खुनाचा प्रयत्न, याचबरोबर चोरी, दरोडे, अपहरण, त्याचार, रस्तालुट अशा एक ना अनेक बेकायदेशीर घटना सध्या अहमदनगर मध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहे. यामुळे शहराचे वातावरण खराब होत असून नागरिक भयभीत होऊन दहशतीखाली जीवन जगताहेत.
अ.नगर जिल्हयात विशेषतः शहरात आता सध्या खूनाचे सत्र सुरु आहे. शहरात सर्रासपणे कोणी कोणावरही अवैध शस्त्रांचा वापर करत जीवघेणे, प्राणघातक हल्ले करत आहेत. यात कोणी जखमी होते, तर कोणी या हल्ल्यात मरत आहेत. मात्र या घटना कमी होण्याऐवजी सातत्याने यात वाढच होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपले अ.नगर शहर हे इतक्या दिवस खड्ड्यांचे शहर म्हणून ओळखले जात होते, मात्र आता अलीकडील काही महिन्यांपासून या अहमदनगर शहराला गुन्हेगारीच शहर म्हणून ओळखले जात आहे.
एकीकडे नगर शहरातील वाढत्या गुन्हेगारीस पोलीस प्रशासनाला जबाबदार धरले जाते, नगर शहरात कोणती ही संवेदनशील घटना घडली ना की लगेच पोलीस प्रशासनाकडे बोट दाखवले जाते. नगर शहरातील गुन्हयाच्या वाढत चाललेल्या घटनांसाठी पोलीसच कारणीभूत आहे किंवा जबाबदार आहे असे म्हणणे खरच कितपत योग्य आहे ?
खरं पाहिल तर नगर शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे, शांतता भंग होवू नये, यासाठी पोलीस दल दिवस रात्र आपले कर्तव्य बजावत असतात, विविध उपाययोजना करत गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्नही करतात पण या अहमदनगर शहरात रोजच काही ना काही छोटे मोठे गुन्हयाचे प्रकार घडतात, यांत गुन्हेगारांमध्ये सर्वांत जास्त तरुण वर्गाचा समावेश आहे. आजचा तरुण मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळू लागला आहे, आणि ही सर्वांसाठी चिंताजनक बाब आहे.
अ. नगर शहरात सध्या हत्या, खुन, प्राणघातक हल्ले होण्याच्या घटनांत तरुणांचा मोठा सहभाग आहे. याचा गांभीर्याने विचार करून तरुणीला गुन्हेगारी पासून वाचवण्यासाठी फक्त पोलीस नव्हे तर समाजातील सर्व घटकांनी आता एकत्र येऊन पुढाकार घेण्याची खरी गरज निर्माण आली आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे पोलीस तर त्यांचे कान करतातच पण पालकांनी नागरिकांनी देखील आपल्या मुलांमुलींकडे लक्ष दयावे, आपले मुलंमुली नेमकं काय करतात, कुठे जातात? कोणासोबत फिरतात? त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहे? हे मुलंमुली मोबाईलचा तसेच सोशल मिडियाचा किती आणि कसा उपयोग करतात, याचबरोबर आपल्या मुलामुलींवर चांगले संस्कार देखिल रूजवणे आजच्या काळात मोठी गरज निर्माण झाली आहे.
गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी जितकी पोलीस प्रशासनाची आहे, त्याहून अधिक जबाबदारी आपली सर्वांचीच आहे. आपण सर्वांनीच कायदयाचे नियमांचे पालन करून गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करणे अत्यंत महत्वाचे आहे.
नगर शहरात वाढती गुन्हेगारी हा अत्यंत किचकट प्रश्न असून यावर तोडगा काढण्यासाठी केवळ पोलीसांकडे बोट न दाखवता स्वतः देखिल आपल्या हातून चूकीचे काम होणार नाही, तसेच कायद्याचे पालन करणे, सामंजस्याची भूमिका घेणे पालकांनी मुलामुलींची चूक किंवा गुन्हा लपवून न ठेवता वेळीच निदर्शनास आणून दयावे, जेणे करून गुन्हयांत वाद न होता, ते चुकीच्या मार्गाने न जाता चांगले कार्य करतील तरुण पिढ़ी चांगल्या मार्गाने गेल्यास नक्कीच गुन्हेगारीचे प्रमाण आपोआपच कमी होईल आणि येणारी उद्याची पिढी देखिल सुसंस्कारितच होईल आणि म्हणूनच गुन्हेगारी खऱ्या अर्थाने थांबवायची असेल तर मुलामुलींना चांगले संस्कार देणे गरजे आहे, सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत असून यामुळे पोलिसांवर मोठा ताण तणाव येत आहे. म्हणूनच गुन्हेगारी थांबवतो हे पोलिसांचेच काम आहे, असे म्हणून हात झटकने चुकीचे असून गुन्हेगारी रोखणे ही तुम्हां आम्हा सर्वांचीच मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी प्रत्येकानेच स्विकारली पाहिजे. तरच आपण सर्वजण शांततेत, एकत्र गुण्यागोविंदाने जीवन जगू शकू हे सर्वांनी समजून घेणे महत्वाचे आहे..
संपादक : आफताब शेख