अहमदनगरच्या राजकारणात खळबळ : माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांची घेतली भेट
लवकरच पक्षाची मोठी जबाबदारी मिळणार
सुरक्षा आणि सुविधांच्या प्रश्नांवर नगरकरांचे व्यापक संघटन उभारणार – अभिषेक कळमकर
अहमदनगर शहरातील राजकारणाचे अलीकडे झालेले भयावह गुन्हेगारीकरण, त्यातून घडत असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या , नगरकरांमधील वाढती भयग्रस्तता आणि नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा या स्थितीवर व्यापक भूमिकेतून आक्रमक नागरी प्रतिसाद देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन अहमदनगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केले.
कळमकर यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तसेच खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आणि शिवसेनेचा राजीनामा दिला. यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर उपस्थित होते.
गेले 3 वर्ष शिवसैनिक म्हणून अहमदनगर शहरातील प्रस्थापितांविरुद्ध श्री.कळमकर यांनी संघर्ष केला. तथापि आता व्यापक स्तरावर आणि परिणामकारक संघर्षाची गरज असल्याने शिवसेनेच्या
सैनिकपदाच्या जबाबदारीतून आजपासून मुक्त होत असल्याचे श्री. कळमकर यांनी आज सांगितले.
माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी अहमदनगरचे राजकारण गरीब आणि कष्टकरी केंद्रित केले.त्यानंतर स्वर्गीय नामदार अनिलभैया राठोड यांनी 1990 च्या दशकात नगर मधील गुन्हेगार आणि प्रस्थापितांच्या अत्याचाराविरुद्ध प्रामाणिक संघर्ष केला. संघर्षाच्या या परंपरेने नगरकरांना हिम्मत दिली . राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि स्थानिक शासनाचा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कारभारावर यातून अंकुश राहिला.
महाराष्ट्र आणि देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीत
नगरकरांना व्यापक स्तरावर संघटित करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
त्यामुळे यापुढे विरोधी पक्षांच्या राजकारणाचा सामाजिक पाया बळकट करण्याची भूमिका घेणार असल्याचेही श्री. कळमकर यांनी नमूद केले.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि नामदार अनिल भैया राठोड यांचा जनसंघर्षाचा वसा यांच्याशी आजन्म बांधिलकी कायम राहील ,असेही श्री. कळमकर यांनी नमूद केले. सर्व शिवसैनिकांचे आणि मान.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेवणाऱ्या नेत्यांची श्री. कळमकर यांनी संघर्षात दिलेल्या सहयोगाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.