अहमदनगर ब्रेकिंग : ३० लाखांचा २२ हजार किलो लसूण केला जप्त… स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री. समद सिद्दीकी तुंबी वय 38, धंदा व्यापार, रा. पोस्ट ऑफिस समोर, ता. दोरांजी, जिल्हा राजकोट, राज्य गुजरात यांची लसुन, कांदा व इतर माल खरेदी विक्रीची एस. एस. ट्रेडींग नावाची कंपनी असुन त्यांनी सिध्दीकी ब्रदर्स गुजरात यांचेकडुन 22,160 किलो वजनाचा 29,91,600/- रुपये किंमतीचा लसुन खरेदी करुन तो निमज मध्यप्रदेश येथुन बैंगलोर या ठिकाणी मोदी रोड लाईन्स ट्रान्सपोर्ट कंपनी मार्फत ट्रक क्र. आरजे/09/जीबी/2918 मध्ये पाठविला होता. सदर ट्रक वरील चालकाने अहमदनगर जिल्ह्यातील साकत शिवारात ट्रकला अपघात झाल्याचा बनाव करुन ट्रक मधील लसुन मध्यस्थी मार्फत परस्पर विक्री केल्याने फिर्यादी यांनी नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 699/2023 भादविक 406 प्रमाणे अपहाराचा गुन्हा दाखल केला होता.
सदर अपहाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, संतोष खैरे, फुरकान शेख, पोकॉ/रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव व मेघराज कोल्हे अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपीचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथक आरोपींचा शोध घेत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर ट्रक वरील चालक सन्वरलाल जाट हा त्याचे साथीदारासह बाभळेश्वर, ता. राहाता येथे असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केल्याने पथकाने लागलीच बाभळेश्वर, ता. राहाता येथे जावुन आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेवुन दोन संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) सन्वरलाल आंबालाल जाट वय 28, धंदा ट्रक ड्रायव्हर व 2) रविकांत काळुराम सेन वय 37, रा. दोन्ही , रा. छपरी, ता. भिलवाडा, राज्य राजस्थान असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता संशयीत आरोपी नामे सन्वरलाल याने अपहार केलेला लसुन त्याचा साथीदार रविकांत सेन यांचे मध्यस्थीने रामदास तुकाराम बोलकर रा. श्रीरामपूर यास विक्री केला असुन, सदर माल हा त्याचे खानापुर शिवारातील पत्र्याचे गोडावुन मध्ये ठेवलेला आहे अशी माहिती दिल्याने पथकाने खानापुर, ता. श्रीरामपूर या ठिकाणी जावुन खात्री करता पत्र्याचे शेडमध्ये एक इसम दिसुन आला त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 3) रामदास तुकाराम बोलकर वय 40, रा. धान्य मार्केट समोर, नेवासा रोड, ता. श्रीरामपूर असे सांगितले. लसणा बाबत विचारपुस करता त्याने सन्वरलाल जाट व रविकांत सेन यांचेकडुन खरेदी केलेला लसुन पत्र्याचे शेडमधुन काढुन दिल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले.
आरोपींचे कब्जातुन गुन्ह्यात चोरीस गेलेला 20,240 किलो वजनाचा 27,32,400/- रुपये किंमतीचा लसुण मिळुन आल्याने तीन्ही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेवुन नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व मा. डॉ. श्री. बसवराज शिवपुजे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.