दैदिप्यमान परंपरा असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या माहुर मेळाव्याची जय्यत तयारी
पत्रकारांनी आपल्या वाहनाला परिषदेचा तिरंगा ध्वज लावून यावे – एस.एम.देशमुख
मुंबई- 85 वर्षाची दैदिप्यमान परंपरा असलेली, मराठी पत्रसृष्टीत सर्वाधिक अधिकृत सदस्य असलेली, अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या माहुर येथील आदर्श जिल्हा व तालुका पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून त्यासाठी नांदेड जिल्हा व माहुर तालुका पत्रकार संघ परिश्रम घेत आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या पत्रकारांच्या निवासासाठी एम.टी.डी.सी. चे विश्रामगृह, शासकीय विश्रामगृह, सहा चांगली लॉजेस येथे व्यवस्था करण्यात आली असून आपण कधी, किती वाजता व किती जण येणार ? याची पूर्वसूचना द्यावी. हिरवा व नयनरम्य परिसर, कार्यक्रमाच्या ठिकाणावरून वर दिसणारे श्री रेणूका मातेच्या मंदीराचे दर्शन होते. मेळाव्याला येताना प्रवासात सुरक्षिततेची काळजी घ्यावी व आपल्या वाहनाला परिषदेने स्विकारलेला अधिकृत तिरंगा ध्वज लावून प्रवासात येणाऱ्या शहरे व खेड्यापाड्यांवर परिषदेच्या शिस्तीचे दर्शन घडवावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केले आहे.
एस.एम.देशमुख यांनी ध्वजसंहितेसंबंधी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, मराठी पत्रकार परिषदेचा हा ध्वज आहे..माहिती व जनसंपर्क विभागाचे माजी उपसंचालक, सतीश लळित यांच्या कल्पनेतून हा ध्वज साकारला आहे.. तो मराठी पत्रकार परिषदेनं स्वीकारला आहे..वरचा लाल रंग, मधला शुभ्र आणि खालचा निळा रंग आहे.. समोर छोट्या छोट्या आकारात सहा रंग आहेत.. मध्यभागी मराठी पत्रकार परिषदेचा लोगो आहे.. मराठी पत्रकार परिषदच्या माहूर मेळाव्यास येताना आपल्या गाडीवर हा ध्वज लावावा अशी अपेक्षा आहे.. माहूर मेळाव्यात प्रथमच आपल्या ध्वजाचं अनावरण पाहुण्यांच्या हस्ते केले जाणार आहे असेही एस.एम. देशमुख यांनी म्हटले आहे.