अहमदनगर : वाकोडी येथील मनपाच्या मैला शुद्धीकरण केंद्राची आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी
सांडपाणी विल्हेवाट सुधारेल नगरकरांचे आरोग्यमान – आ. संग्राम जगताप
नगर – सांडपाणी व्यवस्था ही नगरची खूप वर्षांपासूनची समस्या होती. स्वतंत्र प्रकल्प नसल्याने सांडपाणी सर्रासपणे सिना नदीत सोडले जाते व नदी प्रदूषित होते. सावेडी, सारसनगर, कल्याण रोड, केडगाव या भागाने विस्तारत असलेल्या परिसरात तर शोषखड्डे हाच एकमेव पर्याय सांडपाण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे संपूर्ण शहरात भुयारी गटारीचे जाळे निर्माण करण्यासाठी अमृत योजनेच्या माध्यमातून बहुतांश काम पूर्ण झाले आहे. वाकोडी येथे मनपाच्या वतीने मैला शुद्धीकरण केंद्राची उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते लवकरच पूर्ण होईल. शहरातून वाहणारी सीना नदी अहमदनगरकरांची ओळख आहे मात्र शहराचे सांडपाणी नदीमध्ये सोडल्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो प्रश्न मार्गी लागावा यासाठी नदीला स्वच्छ करण्यासाठी अमृत भुयारी गटार योजनेचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. आता हे सांडपाणी थेट वाकोडी येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये जाणार असून ते पाणी शुद्ध होऊन नदीमध्ये सोडले जाणार आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
अहमदनगर महानगरपालिकेच्या अमृत भुयारी गटार योजने अंतर्गत वाकोडी येथील मैला शुद्धीकरण केंद्राची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपायुक्त सचिन बांगर, उपायुक्त अजित निकत, शहर अभियंता मनोज पारखे, इंजि. श्रीकांत निंबाळकर, उद्योजक राजेश भंडारी, वैभव वाघ, संतोष लांडे, जॉय लोखंडे, निलेश हिंगे, राजेश जैन आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. संग्राम जगताप म्हणाले की, सिना नदीच्या कडेला असलेल्या वाहिनीला भूमिगत गटारीच्या वाहिनीची जोड देण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सीना नदीत विना प्रक्रिया केलेले सांडपाणी जाणार नाही. त्यामुळे डासाची उत्पत्ती, दुर्गंधी पासून सर्वांची सुटका होईल. त्याचा थेट परिणाम आरोग्यमान सुधारण्यावर होणार आहे. याशिवाय जलस्रोतही प्रदूषण मुक्त होण्यास मदत होणार असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी मांडले.
चौकट –
अमृत भुयारी गटार योजनेचे वैशिष्ट्य जुन्या गावठाण भागातील काम, फुलसौंदर मळा येथे मैला शुद्धीकरण केंद्र, 57 एम एल टी क्षमता कलेक्शन सिस्टीम सांडपाणी वाहिनी 125 किलोमीटर, ट्रंक मेन लाईनच्या दोन्ही बाजूने फुलसौंदर मळ्यापर्यंत 14 किलोमीटर लाईनचे काम पूर्ण, फुलसौंदर मळा येथील संपवेल व पंपिंग स्टेशन येथील काम प्रगतीपथावर, फुलसौंदर मळा ते फराहबाग एसटीपी सेंटर पर्यंत १००० एमएम व्यासाची लाईनचे काम पूर्ण, वाकोडी येथील मैला शुद्धीकरण केंद्राचे काम प्रगतीपथावर असून लवकरच या सर्व योजनांचे काम पूर्ण होणार असल्याचे मत आ. संग्राम जगताप यांनी केले.