मनोज जरांगे पाटील बॅकफुटवर, मुंबईला न येता भांबेरीवरुन परतले अंतरवाली सराटीत
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाण्याचा निर्णय स्थगित केला. त्यानंतर मनोज जरांगे अंतरवलीमध्ये दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मराठा समाजातील कार्यकर्त्यांना तत्काळ आपल्या गावाला जाण्याचे आवाहन केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली.
जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावेळी त्यांनी शिवराळ भाषाही वापरली. त्यानंतर समाजातील लोकांनी व्यासपीठावर येऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु संतापलेले मनोज जरांगे पाटील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि ते निघाले. त्यानंतर रात्री भांबेरी येथे मुक्काम केला. सकाळी पुन्हा ते मुंबईकडे निघणार होते. परंतु अचानक त्यांनी हा निर्णय रद्द केला. ते पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल झाले. उपोषणस्थळी पोहचल्यावर डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली.
जरांगे म्हणाले, तुम्ही येऊ नका…
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला होता. मी एकटा जातो तुम्ही कोणी येऊ नका, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ भांबेरी गावामध्ये मराठा आंदोलक दाखल होऊ लागले होते. राज्याच्या विविध जिल्ह्यातून मराठा आंदोलक भांबेरी गावामध्ये येत होते. मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला येऊ नका असे आवाहन केले असले तरी आम्ही त्यांना एकटे सोडणार नाही, असे आंदोलक म्हणत होते. सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मनोज जरांगे पुन्हा माध्यमाशी बोलायला लागले. यावेळी त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय स्थगित केला. आपण अंतरवाली सराटीत जात असून त्या ठिकाणी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे अंतरवलीमध्ये दाखल
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाण्याचा निर्णय स्थगित केला. त्यानंतर मनोज जरांगे अंतरवलीमध्ये दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मराठा समाजातील कार्यकर्त्यांना तत्काळ आपल्या गावाला जाण्याचे आवाहन केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली.