तलवारीचा धाक दाखवून दहा लाख रुपये लुटणा-या युवकांना शेवगावमध्ये अटक
कोवळ्या वयातील मुलांनी इंडस्ट्रीच्या कर्मचाऱ्यावर पाळत ठेवून गुन्हा केला असून पालकांनी आपल्या मुलावर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तीन महिन्यांपूर्वी नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे तलवारीचा धाक दाखवून दहा लाख रुपये लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. या दोघांकडून लुटीचे दहा लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेतून देण्यात आली आहे. शेवगाव येथील तिरुपती कॉटन इंडस्ट्रीचा चेक बडोदा बँकेत देऊन दहा लाख रुपये घेऊन येताना कंपनीतील कर्मचाऱ्यास तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडून दहा लाख रुपये लुटण्यात आले हाेते. ही घटना 28 डिसेंबरला घडली होती. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिले होते. त्यानुसार आरोपींचा शोध घेत असता आरोपी शेवगाव येथील त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून आरोपीच्या राहत्या घरातून आरोपी चेतन प्रमोद तुजारे (19 वर्ष) व समाधान विठ्ठल तुजारे (20 वर्ष) या दोघांना अटक केली आहे. दरम्यान यांचा तिसरा साथीदार अर्जुन तुजारे हा अद्यापही फरारच आहे. दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या दोघा आरोपींकडून दहा लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. 19 व 20 वर्ष असलेल्या कोवळ्या कॉलेज तरुणांनी संबंधित इंडस्ट्रीच्या कर्मचाऱ्यावर पाळत ठेवून हा गुन्हा केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलावर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.