डोंगरे बहुद्देशीय संस्थेला आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार प्रदान
संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या सामाजिक कार्याचा गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेला राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. ना.ज. पाऊलबुधे शैक्षणिक संकुल व दोस्ती फाउंडेशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त झालेल्या राज्यस्तरीय बालकुमार काव्य संमेलनात संस्थेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डोंगरे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. यावेळी बाल साहित्यिक तथा अभिनेते धोंडीरामसिंह राजपूत, स्वागताध्यक्ष आर.ए. देशमुख, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र कापरे, पाऊलबुधे अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखाराणी खुराणा, आर.डी. बुचकूल, दादासाहेब भोईटे, साई पाऊलबुधे, श्रद्धा पाऊलबुधे, नितीन गायके, सुभाष सोनवणे, भाऊसाहेब कबाडी, प्रशांत वाघ, नानासाहेब जीवडे, मुख्याध्यापक भारत बिडवे, गझलकार रज्जाक शेख, कवी देविदास बुधवंत, आनंदा साळवे आदी उपस्थित होते.
स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था नगर तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सामाजिक कार्य करत आहे. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे. ग्रामीण भागात वृक्षरोपण, बीजरोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन संस्थेने पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे. स्त्री जन्माचे स्वागत, वृक्षरोपण, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण जागृती मोहिम व रक्तदान शिबीर व्यापक स्वरुपात राबविण्याचे कार्य सुरु आहे. विविध स्पर्धा, महिला बचत गट मेळावे, व्यसनमुक्तीचे उपक्रम, काव्य व युवा संमेलन घेऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य ते करत आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन डोंगरे संस्थेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.