सुप्रीम कोर्टाचा शरद पवार गटाला मोठा दिलासा, पक्षचिन्ह आणि नावाबाबत निवडणूक आयोगाला निर्देश.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हाच्या वादाच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा दिलासा दिला आहे. शरद पवार गटाला तुतारी चिन्ह लोकसभा निवडणुकीपर्यंत वापरता येणार आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नावही वापरण्याची मुभा दिली आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटाला तुतारी चिन्ह आता राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीतही वापरता येणार आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह राखीव ठेवावे आणि इतर कोणत्याही पक्षाला , उमेदवाराला देऊ नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही महिन्यांपासून फूट पडली आहे. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा दोन गटात पक्ष विभागला गेला आहे. या दोन्ही गटांची कायदेशीर लढाईदेखील निवडणूक आयोगात पार पडली. निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाच्या आधारावर अजित पवार यांच्या गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. तसेच अजित पवार यांचा गट हाच मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, अशी मान्यता निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात गेलाय. या प्रकरणावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टात गेल्या सुनावणीत अजित पवार गटाला झापलं होतं. शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरु नये, असा आदेश देशात सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला झापलं होतं. त्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादीच्या वादावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत शरद पवार यांच्या गटाला आणखी एक दिलासा देण्यात आला. शरद पवार यांच्या गटाला येत्या लोकसभा आणि विधानसभा निडणुकीत तुतारी चिन्ह वापरण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने दिली आहे. तसेच शरद पवार गटाला आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नावही वापरता येणार आहे.
राज्यसभेची काही दिवसांपूर्वी निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव दिलं होतं. हे चिन्ह फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंत होतं, अशी चर्चा होती. पण आता सुप्रीम कोर्टाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी सुद्धा हे नाव आणि चिन्ह शरद पवार गटाला वापरण्याची मुभा दिली आहे.