निलेश लंके फार लोकप्रिय, ते उमेदवार व्हावेत असं वाटतंय, पण… ; जयंत पाटील यांचं मोठं विधान
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूममीवर विविध घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांच्या सोबतचे काही नेते पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे या निवडणूक काळात मोठ्या घडामोडी घडताना दिसतायेत. अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश परतण्याची शक्यता आहे. काही दिवसांआधी लंके यांनी शरद पवारांसोबत पत्रकार परिषद घेतली. मात्र त्यांचा अधिकृत प्रवेश अद्याप झालेला नाही. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. लंके यांच्याबाबत पक्षाची भूमिका काय हे जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. निलेश लंके फार लोकप्रिय आहेत ते उभे राहिले तर 100 टक्के निवडून येतील. निलेश लंके उमेदवार असावेत, असं आम्हाला वाटतं. त्यासाठी आवश्यक ते सोपस्कार आम्ही योग्य वेळी पूर्ण करु. लंके यांना तांत्रिक अडचण निर्माण व्हावी, अशी आमची इच्छा नाही. पण एवढं नक्की सांगतो नगर दक्षिणमध्ये तुतारीच वाजणार, असं जयंत पाटील म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांचं पत्र मी वाचलं आहे. महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा सुरु आहे आहोत. आता त्यांच्याविषयी काही बोलणार नाही. पण आघाडी नाही झाली तर यावर बोलू आज विनाकारण जाहीर वक्तव्य करणे योग्य नाही.त्यांच्या विषयी कोणतेही भाष्य करणार नाही.चर्चा सुरू असताना जागांची वाटा घाटी सुरु असतना कोणतेही वक्तव्य करणार नाही. आमच्या आघाडीचं जागा वाटप झालं की सर्व पक्ष उमेदवार जाहीर करतील, असं जयंत पाटील म्हणाले. राज्यातील वेगवेगळे नेते भेटायला पवार साहेबांना येत आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीचे प्रत्येक तालुक्यात मेळावे घ्यावे अशी चर्चा झाली. माढा लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपमधील कुणीही आमच्याशी संपर्क केला नाही. कुणाशी आमचा संवाद नाही. आम्ही आमचा उमेदवार ठरवत आणला आहे. योग्यवेळी नाव जाहीर करु.सक्षम उमेदवार आम्ही किंवा मित्र पक्ष त्या ठिकाणी उभा करु, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.