पुण्यात कुठल्या पक्षाकडून लढणार? वसंत मोरे यांनी दिले संकेत
पुणे : मनसे पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले नेते वसंत मोरे यांनी मोठा दावा केला आहे. पुण्यात महाविकास आघाडीचाच विजय होईल, असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच “पुण्यात महाविकास आघाडीकडून मला संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे”, असंदेखील वसंत मोरे म्हणाले आहेत. कदाचित महाविकास आघाडीच्या दुसऱ्या यादीत पुण्याचं नाव असेल, असं वसंत मोरे म्हणाले आहेत. “महाविकास आघाडीचं आताचं वातावरण पुणेच नाही, तर पूर्ण महाराष्ट्रात आहे. मला वाटतं की महाविकास आघाडी जिंकून येऊ शकते”, असं वसंत मोरे म्हणाले. “ऑलरेडी मी लंगोट लावलेलं आहे. मी लंगोट लावून मैदानात उतरलो आहे. फक्त आता मला कोणत्या दिशेने कोणता डाव टाकायचा ते मी थोड्या दिवसांत ठरवेल. मला शंभर टक्के भाजपला चितपट करायचं आहे”, अशी भूमिका वसंत मोरे यांनी मांडली. “मला वाटतं की, महाविकास आघाडीच्या दुसऱ्या यादीत आपल्या पुण्याचा विचार होऊ शकतो”, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.
“मनसेच्या प्रश्नावर मी उत्तर देऊ शकत नाही. पक्ष संघटना आहे, पक्षाचे नेते आहेत, पुण्यातील मनसेच्या नेत्यांना याबाबत विचारावं. ते नेते त्याबाबत उत्तर देतील”, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.