दोन दिवसाच्या बाळावर अंबाजोगाईच्या लाड हॉस्पिटल मध्ये झाली यशस्वी शस्त्रक्रिया.
अंबाजोगाई : शौचाची जागा अर्धवट विकसित झालेल्या आणि दोन दिवस वय असलेल्या केज तालुक्यातील (जि.बीड) येथील बाळावर अंबाजोगाईच्या लाड हॉस्पिटल मध्ये अवघड अशा प्रकारची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अखेर त्या बाळाला जीवदान मिळाले. आपले बाळ सुखरूप आहे हे पाहून बाळाच्या पालकांचा आनंद मात्र गगनात मावत नव्हता. केज तालुक्यातील (जि.बीड) येथील नुकत्याच प्रसुती झालेल्या महिलेचे दोन दिवसाचे बाळ गुदद्वार नसल्यामुळे केज येथून अंबाजोगाई पर्यंत एका रूग्णवाहिकेमधून आणण्यात आले होते. त्या बाळाला तात्काळ लाड हॉस्पिटल, अंबाजोगाई येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. बाळाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर असे समजले की, बाळाची शौचाची जागा ही अर्धवट विकसित झालेली आहे. त्यामुळे बाळाची स्थिती ही अतिशय गंभीर (क्रिटिकल) होती. बाळाच्या नाड्या लागत नव्हत्या, बाळाचे पोट फुगलेले होते. बाळाचे वजन कमी होते. अशा नाजूक परिस्थितीत डॉ.विजय लाड यांनी गांभीर्य ओळखून त्या बाळावर लाड हॉस्पिटल मध्ये तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्या संदर्भात बाळाच्या पालकांशी चर्चा केली. त्यानंतर डॉ.विजय लाड यांनी त्यांचे मित्र आणि लहान मुलांचे शल्यचिकित्सक डॉ.रूपेश सिकची (अहिल्यादेवीनगर) यांच्याशी संपर्क साधला. तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. यापूर्वी ही अशा प्रकारच्या अवघड आणि दुर्मिळ अशा शस्त्रक्रिया या अंबाजोगाई शहरातील वैद्यकीय क्षेत्रात पहिल्यांदाच लाड हॉस्पिटल मध्ये झालेल्या आहेत. डॉ.रूपेश सिकची यांनी ही शस्त्रक्रिया यशस्विरीत्या पूर्ण केली. त्यानंतरची काळजी व पूर्ण उपचार (ट्रीटमेंट) डॉ.विजय लाड यांनी केले. शस्त्रक्रियेनंतर बाळाला तीन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पाचव्या दिवशी बाळाने उपचाराला योग्य असा प्रतिसाद दिला. त्यानंतर सहाव्या दिवशी बाळाला दुध देणे सुरू करण्यात आले. बाळाला दूध पचू लागले. हळू हळू दूध देण्याचे प्रमाण वाढविण्यात आले. बाळाच्या प्रकृती मध्ये चांगली सुधारणा दिसून आली. बाळ काही दिवस लाड हॉस्पिटल मध्येच राहिले. बाळ आता ठणठणीत व सुखरूप आहे. त्याला नुकतीच रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ.रूपेश सिकची यांचे विशेष सहाय्य लाभले. तज्ज्ञांच्या प्रयत्नांनी दोन दिवसाच्या बाळाला जीवनदान मिळाले. तसेच लाड हॉस्पिटल मध्ये ज्या बाळांची लघवीची जागा व्यवस्थित नाही. त्यांचेवर सुद्धा यशस्विरित्या शस्त्रक्रिया करण्यात येते. अशी माहिती लाड हॉस्पिटलचे संचालक तथा सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.विजय लाड यांनी दिली आहे.