अल्पखर्चात शेतातच नैसर्गिक खत निर्मितीचे तंत्र या विषयावर शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन
अफार्म-पुणे, जयप्रभा ग्रामीण विकास मंडळ, पंजाबराव देशमुख सेंद्रीय व नैसर्गिक शेती मिशनचा पुढाकार ; शेतकऱ्यांचा प्रतिसाद
अंबाजोगाई (वार्ताहर)
तालुक्यातील मौजे चनई येथे अफार्म-पुणे, जयप्रभा ग्रामीण विकास मंडळ, पंजाबराव देशमुख सेंद्रीय शेती व नैसर्गिक शेती मिशनचा पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी अल्पखर्चात शेतातच नैसर्गिक खत निर्मितीचे तंत्र या विषयावर कार्यशाळेचे आयोजन गुरूवार, दिनांक १३ जुन रोजी करण्यात आले होते. या कार्यशाळेस तालुक्यातील विविध गावच्या शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
चनई (ता.अंबाजोगाई) येथील श्री खंडोबा मंदिरात शेतकऱ्यांसाठी अल्पखर्चात शेतातच नैसर्गिक खत निर्मितीचे तंत्र या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा अफार्म, पुणे, जयप्रभा ग्रामीण विकसा मंडळ, पंजाबराव देशमुख सेंद्रीय शेती व नैसर्गिक शेती मिशन यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा (काकाजी) तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन तोटावार साहेब (सहसंचालक, कृषि विभाग, नागपूर) व डॉ.संतोष चव्हाण (संचालक, फार्मलॅब्स, पुणे व संशोधन संचालक जयकिसान शेतकरी गट, वाशिम, संस्थापक – शेतकऱ्याच्या बांधावरची सेंद्रीय प्रयोगशाळा, वाशिम) हे मान्यवर उपस्थित होते. प्रथम सत्रात बोलताना तोटावार यांनी सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढीसाठी यशस्वी पेरणीची अष्टसुत्री या विषयावर पीपीटीच्या द्वारे शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. अष्टसुत्रीमध्ये बियाणे प्रतवारी, बियाण्याच्या उगवणशक्ती तपासणीच्या घरगुती पध्दती, बिजप्रक्रिया, सुधारित वाण, पेरणी व पेरणीची खोली, पेरणीची पध्दत व त्याची मात्रा, रासायनिक खत मात्रा, तणनाशकाचा वापर याचे विश्लेषण हे शास्त्रीय पध्दतीने केले. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीन पेरण्यासाठी सुाधारित वाणा ६७ टक्के बियाणे हे स्वायरल सेप्रेटरद्वारेच केलेले असावे. बाजारातून नवीन वाण खरेदी करावयाचे असल्यास त्याची उगवण शक्ती तपासावी ६० टक्के पेक्षा कमी उगवण शक्ती असेल ते बियाणे वापरू नये. पाच दिवसानंतर अंकुरित बियांची टक्केवारी काढावी. आणि बिजप्रकिया करावी. आपल्या शेतात सतत दोन-तीन दिवस ७५ ते १०० मि.मी, किंवा ६ इंच जमिन ओली झाल्यानंतर वापसा आल्यानंतरच पेरणी करावी. पेरणी करताना बियाणे ३ ते ५ सें.मी. खोलीवर पडत असल्याची खात्री करावी. बहुपिक पेरणिचा वापर केल्यास शेतकऱ्यांचा फायदाच होतो. यासाठी ४:१ किंवा ६:१ (सोयाबीन + तुर) पेरणी करावी. हि करताना बीबी एक टोकण यंत्र किंवा बैलाच्या सहाय्याने करावी म्हणजे अधिक फायदा होईल. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डॉ.संतोष चव्हाण यांनी अल्पखर्चात शेतातच नैसर्गिक खत कशा पध्दतीने तयार करायचा या विषयावर पीपीटीच्या द्वारे शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. रासायनिक खतांच्या वाढत्या प्रमाणामुळे जमिनीची नापिकी वाढून त्याचे रूपांतर विविध मानवी रोगात. जसे की, कॅन्सर मध्ये होत आहे. यावर एकच उपाय म्हणजे शेतकऱ्यांना घरात तसेच बांधावर कमी खर्चात खत तयार करता येते. घरातील दररोजच्या वापरातील चहा पत्तीवर सुध्दा खत तयार करता येतील. केळीच्या सालीवर ट्रायक्रोडर्मा तयार करता येतो. घरी एक किलोच्या ज्वारी पीठ तयार करताना १ किलोच्या प्रमाणात ज्वारी, बाजरी, गहु, तांदुळ व डाळीचे पीठ एकत्रित करून ही व आंबवून ते पिकासाठी खुप लाभदायक होते. शेतकऱ्यांनी आपल्या बांधावरील विविध झाडपाला कुजवुन दशपर्णी अर्क तयार करून तो पिकांना फवारला तर किडे नियंत्रण होण्यास मदत होते. सोबतच शेतकरी याचा स्वतः व्यवसाय ही करू शकतो. शेतात किंवा घरात अशा प्रकारची खतं व जैविके तयार करता येतील. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातच खते, जैविके, तयार करावीत, तसेच या पध्दतीचा अवलंब करून गावातील परिसरातील शेतकऱ्यांना खते व जैविके तयार करून वापरता येतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी खोगरे (सचिव, जयप्रभा ग्रामीण विकास मंडळ) यांनी केले. या प्रसंगी दगडुसाहेब देशमुख, अमर देशमुख, विक्रमराव देशमुख, चंद्रशेखर तोटावार, बाबुराव धिमधीमे, अनुरथराव मामडगे, बापू आजबे, शरद देशपाडे आदिंसह मान्यवर व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. या कार्याशाळेचा माकेगाव व चनई व परिसरातील एकूण १८५ हून अधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतला.