महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘जोडे घाला आंदोलनाने तहसील परिसर दणाणला
तलाठ्यांनी नेमून दिलेल्या सज्जावरूनच कामकाज करावे ; शहरातील खाजगी कार्यालये तात्काळ बंद करा – उपजिल्हाध्यक्ष सुनिल जगताप
अंबाजोगाई – तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी त्यांच्या नेमून दिलेल्या सज्जावरच राहुन कामकाज करावे, तलाठ्यांनी शहरातील त्यांचे खाजगी कार्यालये तात्काळ बंद करावीत. या प्रमुख मागणी करीता तहसिल कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपजिल्हाध्यक्ष सुनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी ‘जोडे घाला आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनाने तहसील परिसर दणाणून गेला होता.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सन २०२२ ते आजतागायत पर्यंत सदरील विषयाचा पाठपुरावा सुरू आहे. याबाबत २४ जुन २०२४ रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यांनंतर मागील ८ दिवसांपासून उपजिल्हाध्यक्ष सुनिल जगताप यांनी सोशल मीडियावरून तालुक्यातील तलाठी सज्जांच्या बंद इमारतीचे फोटो, व्हिडिओ, माहिती शेयर करून जनतेला आवाहन व जनजागृती केली. महसूल प्रशासनाने याबाबत तात्काळ कार्यवाही करावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवार, दिनांक २ जुलै रोजी ‘जोडे घाला आंदोलन’ करण्यात आले. मंगळवारी बस स्थानकापासून निघून ते तहसील कार्यालयासमोर हालगीच्या निनादात दोन बांबूंना खेटरांची माळ बांधून, गगनभेदी घोषणा देत हे अनोखे आंदोलन करण्यात आले. तहसीलच्या प्रवेशद्वारावरच आंदोलकांना पोलिसांनी रोखले. त्यामुळे खेटरांची माळ तहसीलच्या प्रवेशद्वाराला बांधण्यात आली. याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष सुनिल जगताप यांनी आंदोलनाविषयी सविस्तर भूमिका मांडली. तर श्री कुलकर्णी, लक्ष्मण शिंदे यांनी ही सहभागी आंदोलकांना संबोधित केले. यावेळी तलाठ्यांची खाजगी जागेतील कार्यालयं बंद करा, तलाठ्यांनी त्यांच्या मुळ नेमून दिलेल्या सज्जावरूनच काम करावे, फेरफार नोंदी व इतर कामांसाठी शासकीय नियमानुसार शुल्क घ्यावे, अधिकचे पैसे घेऊ नयेत अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर मनसैनिकांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. त्यानंतर तहसीलचे प्रतिनिधी आले व त्यांनी मनसैनिकांना तहसीलदार यांना भेटण्याची अनुमती दिली. प्रवेशद्वारा जवळच तहसीलदार यांनी आंदोलकांशी चर्चा केली. व त्यांचे निवेदन स्वीकारले. दिलेल्या निवेदनात अंबाजोगाई शहरातील तलाठ्यांची खाजगी कार्यालये तात्काळ बंद करा., नेमून दिलेल्या पत्याच्या ठिकाणी व बांधून दिलेल्या सज्जाच्या इमारतीतच तलाठ्यांनी उपस्थित राहून कामकाज करावे, शासन निर्णय महसूल व वनविभाग क्रं.२०१६/४६५/ई-१० दि. ०६.०१.२०१७ चे काटेकोरपणे पालन करावे., नायब तहसीलदार यांच्या नेतृत्वात समिती नेमून तलाठ्यांच्या खाजगी कार्यालयांचे तात्काळ पंचनामे करा व शासनाच्या गोपनिय दस्ताऐवजांची सुरक्षा धोक्यात आणल्या प्रकरणी तलाठ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी., आपले आदेश क्रं.२०२२/आस्थापना/निवेदन/कावि ६४२ दि. २६.०३.२२ चे मधील सुचनांचे पालन न करणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठी यांचेवर कायदेशीर कार्यवाही करावी तसेच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व इतर घरकुल योजना अंतर्गत मंजुर झालेल्या घरकुलांना शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ वाळू उपलब्ध करून द्यावी. या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर उपजिल्हाध्यक्ष सुनिल जगताप, शहराध्यक्ष गणेश बरदाळे, मनविसेचे उपजिल्हाध्यक्ष नितीन परदेशी, मनविसेचे तालुकाध्यक्ष श्री कुलकर्णी, तालुका उपाध्यक्ष रमेश आडे, तालुका सचिव लक्ष्मण शिंदे, तालुका उपाध्यक्ष विलास शिंदे, तालुका उपाध्यक्ष यशवंत राजेभाऊ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी पुढील ८ दिवसांत याप्रश्नी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी देखील तलाठ्यांच्या कार्यपद्धती बद्दल तहसीलदार यांच्यापुढे आपली कैफियत मांडली.
तर यापुढे कपडे फाडो आंदोलन करणार..! :
सर्व तलाठ्यांना त्यांच्या नेमून दिलेल्या ठिकाणी व बांधून दिलेल्या सज्जांमध्ये (कार्यालयामध्ये) उपस्थित राहून कामकाज करणे बंधनकारक असताना तसे होत नाही. दिनांक ०६.०१.२०१७ च्या शासन निर्णयानुसार उपस्थिती बाबतची नियमावली ही पाळली जात नाही. अंबाजोगाई तालुक्यात सुमारे ४० तलाठी सज्जांच्या इमारती तयार आहेत. पण, त्यांचा वापर केला जात नाही. एका इमारतीच्या निर्मितीवर अंदाजे १२ ते १४ लाख रूपये एवढा खर्च झालेला आहे. असे असताना सध्या अनेक इमारतींमध्ये जनावरांचा गोठा, वराहांचा मुक्त विहार आणि अवैध कृत्य सुरू आहेत. यामुळे जनतेच्या कर रूपाने जमा झालेल्या पैशाची नासाडी होत आहे. हे पहावत नाही. याप्रश्नी लवकर कार्यवाही केली नाही. तर यापुढे मनसे कपडे फाडो आंदोलन करणार..!
– सुनिल जगताप
(जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बीड.)