ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविणार – अध्यक्ष ऍड.अनंतराव जगतकर
ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा
अंबाजोगाई – येथील ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा कुणबी विकास मंच सभागृह, मुकुंदराज रोड येथे रविवार, दिनांक ३० जून रोजी आयोजित करण्यात आली होती.
या सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष ऍड.अनंतराव जगतकर हे होते. तर व्यासपीठावर पुंडलिक पवार, मनोहर कदम, कोषाध्यक्ष श्रीरंग चौधरी, सचिव लक्ष्मणराव गोरे, उद्धवराव बापू आपेगावकर, नारायणराव केंद्रे, पद्माकर सेलमोकर, दत्तात्रय आंबाड, सहसचिव शिवाजी शिंदे इत्यादी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. सभेची सुरूवात सानेगुरूजींच्या प्रार्थनेने झाली. जुन महिन्यात ज्यांचा वाढदिवस आहे अशा ४० ज्येष्ठांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देवून अभिष्टचिंतन आणि नवीन सदस्यांचे स्वागत करण्यात आले. गत आर्थिक वर्षातील सर्व क्षेत्रातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व्यासपीठावरील मान्यवरांच्या स्वागतानंतर कोरम अभावी अर्धा तास सभा तहकूब करून पुढे अध्यक्षांच्या परवानगीने सभा पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी सचिव लक्ष्मणराव गोरे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याचा वार्षिक अहवाल चार भागात तसेच ३० ते ३५ विविध मुद्द्यांवर कृती कार्यक्रम सादर केला. वार्षिक अहवाल वाचनानंतर संघाचे आजीव सभासद शुल्क पुर्वीप्रमाणेच कायम ठेवण्याच्या निर्णयाचे उपस्थित सर्व १२५ सभासदांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. यानंतर संघाचे कोषाध्यक्ष श्रीरंग आबा चौधरी यांनी लेखापरीक्षण अहवाल याचे वाचन केले. त्यामध्ये तेरिज पत्रक, ताळेबंद, नफा तोटा पत्रक यावर सविस्तर अहवाल सभागृहासमोर ठेवताना संघाने केलेला खर्च, संघाचे आजीव सभासद शुल्क, एफडी वरील प्राप्त व्याज याचा उल्लेख केला. संघाचे माजी सचिव मनोहर कदम यांनी सन २०२३-२४ मधील लेखादोष दुरूस्ती वाचून दाखवत त्यास सभागृहाची मान्यता घेतली. व दिनांक १७ जून २०२४ रोजी ऑडिट रिपोर्ट सीए व्ही.बी वालवडकर यांचेकडून प्राप्त झाला असल्याचे सांगितले. उपस्थित सर्व सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात याचे स्वागत केले. आगामी वर्ष २०२४-२५ चे वार्षिक अंदाजपत्रक संघाचे सहसचिव शिवाजी शिंदे यांनी सादर केले. त्यास उपस्थित सर्वांनी हात वर करून मंजुरी दिली. शेवटी अध्यक्षीय समारोप करताना संघाचे अध्यक्ष ऍड.अनंतराव जगतकर यांनी अनेक नवनविन संकल्पना जाहीर केल्या ज्यात ज्येष्ठांसाठी विरंगुळा सेंटर, नगरपालिका गार्डन, हास्य क्लब, संघाचे स्नेहसंमेलन, ज्येष्ठ नागरिक संघाकरिता नवीन जागेचा शोध घेत आहोत हे नमूद केले. तसेच पंडित उद्धवराव बापू अपेगावकर यांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येईल याचा आवर्जून उल्लेख केला. उपस्थितांचे आभार प्रसिद्धीप्रमुख मनोहर कदम यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. वार्षिक सर्वसाधारण सभा ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.