केरळच्या सिंधू पणीकर (नवगिरे) यांना आंतरभारतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार 15 ऑगस्ट रोजी सन्मानपूर्वक वितरण
आंबाजोगाई- दर वर्षी 15 ऑगस्ट रोजी दिला जाणारा आंतरभारतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार यंदा केरळची कन्या सिंधू पुरुषोथमन पणीकर (नवगिरे) यांना दिला जाणार आहे.
अन्य प्रांतातून येऊन आंबाजोगाईत वास्तव्य करणाऱ्या व आंबाजोगाईच्या गौरवात भर टाकणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.
श्रीमती सिंधू ह्या केरळच्या कोट्यायम जिल्ह्यातल्या. बी एस्सी नरसिंग करून आंबाजोगाईत आल्या. सुरुवातीला मानवलोक मध्ये काम केले. नंतर एम आय टीत सेवा दिली. तेथेच मारुती नवगिरे यांचा परिचय झाला. त्यांनी आंतर प्रांतीय व मानवी विवाह केला. पुढे त्यांनी बी एड करून एम आय टीच्या सरस्वती विद्यालयात सहशिक्षिकेची नोकरी पत्करली. श्रीमती सिंधू यांनी इंग्रजीत एम ए केले आहे. त्यांची दोन्ही मुले पुण्यात शिक्षण घेत आहेत. केरळची कन्या आंबाजोगाईची सून आहे म्हणून तिचा सन्मान करणे आंबाजोगाईकरांचे कर्तव्य ठरते. याच भावनेने हा पुरस्कार दिला जात आहे.
मानकरी 2014ला प्राचार्य बी आय खडकभावी यांचा सन्मान करून स्नेहसंवर्धन पुरस्कार सुरू करण्यात आला होता. त्यानंतर मनीष स्वीटचे शशिकांत रूपडा (गुजरात), प्राचार्य महावीर शेट्टी (कर्नाटक), मेवाडचे शंकरजी मेहता (राजस्थान), आनंदराव अंकम (तेलंगण), उडपी हॉटेलच्या सुशीलाताई शेट्टी (कर्नाटक), सिमेंटच्या वस्तूंचे निर्माते शेख शमीम (उत्तर प्रदेश), लाकडी काम करणारे राजू जागींड (राजस्थान), टायर रिमोल्ड करणारे अजिथकुमार कुरूप (केरळ), वाचमनचे काम करणारे नरपती कुंजेडा (नेपाळ) यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. एकमेव शहर अन्य प्रांतातून येऊन स्थायिक झालेल्या व शहराच्या गौरवात भर घालणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्याची परंपरा आंबाजोगाईने सुरू केली आहे. या मागे ‘हम सब एक हैं’ ही राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट करण्याचा विचार आहे.