उच्च शिक्षणाला नवीन संदर्भ प्रदान करणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या विषयावर खोलेश्वर महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
अंबाजोगाई – “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे उच्च शिक्षणाला नवीन संदर्भ प्रदान करणारे आहे,” असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगरचे मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके यांनी केले. ते डॉ. बा.आं. म. विद्यापीठ, संभाजीनगर आणि खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी” या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी हे उपस्थित होते तर मंचावर उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. गोपाळराव काकडे, भा.शि. प्र. संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा खोलेश्वर महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष श्री. राम कुलकर्णी आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शुक्रवार दि.11 जुलै 2024 रोजी खोलेश्वर महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, धारूर, माजलगाव, परळी व वडवणी तालुक्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक, एन.ई.पी. प्रमुख अपेक्षित होते. एकूण 160 जणांनी या कार्यशाळेत आपला सक्रिय सहभाग नोंदविला.
प्रारंभी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यशाळेस सुरुवात झाली.
केंद्र शासन तथा महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठाच्या विविध परिपत्रकांचा दाखला देत डॉ. संजय साळुंके पुढे बोलताना म्हणाले की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व प्राध्यापक, प्राचार्य व संस्थाचालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने यावर्षी प्रथम वर्षाला प्रवेश देताना विद्यार्थ्यांनी घ्यावयाचे विषय, विद्यापीठाने बकेट मध्ये दिलेले विषय, कौशल्याधारित विषयांची निवड या अनुषंगाने मार्गदर्शन करताना प्राध्यापकांच्या येणाऱ्या कार्यभाराविषयीची समस्या, वेळापत्रकाविषयीची समस्या याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी केंद्रित असून विविध कौशल्यांना वाव देणारे व व्यवसायाभिमुख कौशल्याधारित विद्यार्थी निर्माण करणारे आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरेही दिली. या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अंमलबजावणीसाठी निर्माण होणारे विविध प्रश्न सोडविण्यासाठी विद्यापीठाचा अधिष्ठाता म्हणून प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री. राम कुलकर्णी यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी ही काटेकोरपणे झाली पाहिजे त्यामुळेच भविष्यातील सशक्त भारत निर्माण होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले प्राचार्य डॉ. गोपाळराव काकडे म्हणाले की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतील अडचणींकडे लक्ष न देता त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या. अध्यक्षीय समारोप करताना खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्यास काहीही अवघड नसते. आपणास शिक्षण पद्धती सशक्त करायची आहे, विद्यार्थ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनविण्यासाठी कौशल्याधिष्ठित शिक्षण द्यायचे आहे. यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू. येणाऱ्या अडचणी विद्यापीठ व शासनाकडून सोडवून घेऊ असे विचार व्यक्त केले. या कार्यशाळेसाठी प्राचार्य डॉ. थारकर, प्राचार्य डॉ. दळवे यांच्यासह अनेक प्राध्यापकांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश हिवरेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नितीन केंद्रे तर आभार निमंत्रक तथा उपप्राचार्य प्रा.डॉ. सुभाष पटेकर यांनी मानले.