मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर लातूर येथील आमरण उपोषण स्थगित
• पालकमंत्री गिरीश महाजन यांचा पाठपुरावा
• येत्या आठ दिवसात उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार
विविध मागण्यांसाठी लातूर येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे विधानभवनात 12 जुलै रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकल धनगर समाजबांधवांच्या शिष्टमंडळासोबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने येत्या आठ दिवसात मंत्रालयात संबंधित उच्च पदस्थ अधिकारी यांची बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्राद्वारे दोन्ही उपोषणकर्त्यांना दिली, तसेच उपोषण स्थगित करण्याचे आवाहन दोन्ही उपोषणकर्त्यांना केले. याबाबतचे पत्र प्राप्त झाल्यानंतर दोन्ही उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार जयकुमार रावल, आमदार श्वेता महाले, साधना गवळी, गणेश हाके, देविदास काळे, बाळासाहेब किसवे आदी यावेळी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये उपोषणकर्त्यांच्या प्रतिनिधींनी सकल धनगर समाजबांधवांच्या मागण्या सादर केल्या. या मागण्यांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. ही बाब धोरणात्मक व न्यायिक असल्याने याबाबत संबंधित उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासमवेत येत्या आठ दिवसात सविस्तर बैठक आयोजित करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे उपोषणकर्ते अनिल गोयेकर आणि चंद्रकांत हजारे यांनी आपले दीर्घ उपोषण तत्काळ मागे घेवून शासनास व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. याबाबतचे पत्र प्राप्त झाल्यानंतर समाजबांधवांशी चर्चा करून दोन्ही उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तसेच लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या उपस्थितीत उपोषण स्थगित करण्यात आले.
News today 24 असलम शेख लातुर,