नवअभियंत्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण
क्रेडाई महाराष्ट्र – अभियांत्रिकी महाविद्यालयाचा स्थापत्य विभाग यांच्यात सामंजस्य करार (एम.ओ.यू.)
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
कौशल्यपूर्ण शहर अभियंते (सिव्हिल इंजिनिअर्स) तयार व्हावेत, या अपेक्षेने क्रेडाई महाराष्ट्र तर्फे आता भावी अभियंत्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या संदर्भात गुरूवारी अभियांत्रिकी महाविद्यालय, अंबाजोगाईचा स्थापत्य विभाग (डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग) आणि क्रेडाई यांच्यात सामंजस्य करार (एम.ओ.यू.) झाला. त्यानुसार पुढील चार वर्षे भावी अभियंत्यांना कौशल्याधारित प्रशिक्षणासोबतच नौकरीची संधी ही उपलब्ध होणार आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरूवार, दिनांक १८ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे अभियांत्रिकी महाविद्यालय अंबाजोगाईचा स्थापत्य विभाग (डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग) आणि क्रेडाई यांच्यात सामंजस्य करार झाला. क्रेडाईच्या कार्यालयात अध्यक्ष प्रमोद खैरनार आणि अभियांत्रिकी महाविद्यालय अंबाजोगाईचा स्थापत्य विभाग (डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग) प्रमुख डॉ.व्हि.एस.राजमान्य यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे माजी सहसंचालक डॉ.अजित थेटे हे मान्यवर उपस्थित होते. क्रेडाई महाराष्ट्र हे राज्यस्तरीय फेडरेशन आहे. क्रेडाई ही संघटीत रिअल इस्टेट डेव्हलपर्स / बिल्डर्सची सर्वोच्च संस्था आहे. या संघटनेचे महाराष्ट्रात तब्बल ३ हजारांहून अधिक सभासद आहेत. ज्यात अनेक नामांकित कंपन्यांचा, उद्योगांचा समावेश आहे. अशा प्रतिष्ठीत संस्थेसोबत अभियांत्रिकी महाविद्यालय, अंबाजोगाईचा स्थापत्य विभागाचा (डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग) सामंजस्य करार (एम.ओ.यू.) होणे ही गौरवपूर्ण बाब आहे. यापूर्वी ही स्थापत्य विभागाने (डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग) अनेक नामांकित कंपन्यांच्या सोबत सामंजस्य करार (एम.ओ.यू.) केले. ज्यातून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना देशात आणि परदेशात नौकरीच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. हे विशेष होय. या अभिनव उपक्रमाबद्दल प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी म्हणाले की, काही अभियंते इंटर्नशिप करत असले तरी ती अभियंता म्हणून विषयाचे सर्वांग आकलन करून देणारी नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषयाचे ३६० डिग्री सर्वांग ज्ञान मिळावे, ते पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन प्रात्यक्षिक आणि कौशल्याधारित प्रशिक्षण देणारे असावे, हा विचार करीत असताना अपस्किलिंग कार्यक्रम आम्ही तयार केला. यामध्ये बांधकामाच्या सुरूवातीच्या टप्प्यापासून ते अगदी शेवटच्या फिनिशिंगच्या टप्प्यापर्यंत सर्व बाबींचा अंतर्भावही केला आहे. प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची योग्य ती नोंद घेतली जाईल. मानवी मूल्यांसह उद्योग आणि समाजाच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी तांत्रिक ज्ञानासह विद्यार्थ्यांचे परिवर्तन सुलभ करण्याची दृष्टी देण्याचे, विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यार्थी केंद्रीत आणि गतिमान अध्यापन – शिक्षण प्रक्रियेद्वारे शैक्षणिक उत्कृष्टतेचा पाठपुरावा करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी स्वातंत्र्य आणि मोकळेपणाला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये नैतिक, नैतिक मूल्ये आणि सहानुभूतीपूर्ण गुण रूजविण्याचे काम अभियांत्रिकी महाविद्यालय, अंबाजोगाई सातत्याने करीत आहे अशी माहिती ही प्राचार्य डॉ.खडकभावी यांनी दिली आहे.