मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत नागरी सहकारी बँकांमध्ये खाती उघडण्यास सहकार आयुक्त व निबंधक यांची मान्यता
अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक महिलांना केवळ १००/- रुपयात त्यांची खाते उघडून देणार– राजकिशोर मोदि
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिला भगिणीसाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना नुकतीच जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १५००/- रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्यातील महिलांची सरकारी बँकेत खाते उघडण्यास एकच झुंबड उडत आहे. मात्र सरकारी बँका महिलांचे खाते उघडून घेण्यासाठी उदासीनता दाखवत सदर बँका महिलांना नाहक त्रास देत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यानें शासनाकडून सहकार आयुक्त कार्यालयाने नुकतेच नागरी सहकारी बँकांना देखील महिला भगिनींचे खाते उघडून घेण्यास मान्यता दिली आहे. सहकार आयुक्तांच्या मान्यतेच्या अनुषंगाने अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेच्या मुख्य शाखा (प्रशांत नगर, राज हॉटेलच्या बाजूस) यासह सर्व शाखांमध्ये केवळ १००/- रुपयात महिलांना त्यांची खाती उघडून दिली जाणार आहेत . तेव्हा अंबाजोगाई शहर व परिसरातील त्याचबरोबर अन्य ठिकाणच्या सर्व अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या शाखेत महिला भगिनींनी आपली खाते उघडून घेऊन मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी तथा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांनी केले आहे.
शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य त्याचबरोबर पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना”, लागू केलेली आहे. सदर शासन निर्णयान्वये राज्यातील महिलांसाठी त्यांना दरमहा रु. १५००/- इतकी रक्कम देण्याबाबत शासन योजना जाहिर केलेली आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील शासकीय बँका कमी पडू लागल्या आहेत.पर्यायाने राज्यात विविध नागरी सहकारी बँकाच्या शाखा राज्यभर असल्याने या बँकांमध्ये सदर योजनेचे खाते उघडल्यास महिलांना मदत होणार आहे. हीच बाब विचारात घेऊन, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या शासन योजने अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनूसार नागरी सहकारी बँकांमध्ये खाती उघडण्यात यावीत अशा शासन मान्यतेचे पत्र नुकतेच दि १९/७/२०२४ रोजी शासनाच्या सहकार आयुक्त कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.
याच शासकीय मान्यता पत्राच्या अनुषंगाने अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक लि. अंबाजोगाई ही बँक महिलांना कसलाही नाहक त्रास न होऊ देता केवळ १००/- रुपयात त्यांचे खाते उघडून देणार आहे. बँकेच्या चौसळकर कॉलनी, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील शाखेत तसेच जोगाईवाडी येथील शाखेत केवळ १००/- रुपयात आपली खाती उघडून घ्यावीत असे आवाहन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांनी केले आहे. यापूर्वीही अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षामुळे अंबाजोगाई परिसरातील महिलांना बँकिंग क्षेत्राविषयी माहिती व्हावी म्हणून महिलांच्या साठी बँकिंग प्रशिक्षण शिबिराचे अयोजन करण्यात आले होते. त्याच बरोबर कोव्हिडं काळात देखील सामाजिक सेवाभाव म्हणून महिलांच्या साठी १००/- रुपयात त्यांची खाती सुरू करण्यात आली होती.