११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बालाजी सुतार यांची एकमताने निवड
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रतिभावंत लेखक बालाजी सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मसाप शाखा अंबाजोगाईच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ही सर्वानुमते निवड करण्यात आली.
११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जोरदार तयारी सुरु असून स्वागताध्यक्ष म्हणून यापुर्वीच ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध उपक्रमांचे नियोजन स्वागत समितीने सुरु केले असतांनाच मसाप कार्यकारिणी आणि स्वागताध्यक्ष यांच्या सहमतीने या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील प्रतिभावंत लेखक बालाजी सुतार यांची निवड करण्यात आली आहे.
■ अध्यक्ष निवडीची पद्धत
मावळते अध्यक्ष नूतन अध्यक्षांचे नाव सुचवतात. त्यांनी सुचवलेल्या नावाचा बंद लिफाफा मसाप, शाखा आंबाजोगाईच्या विशेष कार्यकारिणीच्या बैठकीत उघडला जातो. त्या नावावर कार्यकारिणीचे एकमत झाले तर ते नाव जाहीर केले जाते. पण जर एखाद्याने जरी विरोध नोंदविला तर मात्र निवडणूक घेऊन अध्यक्ष ठरवला जातो. या निवडणुकीत मसापचे आंबाजोगाई येथील आजीव सभासद व पाहिले शंभर स्वागत सभासद मतदान करू शकतात. आतापर्यंत कधीच मतदानाची वेळ आली नाही. याही वेळेला प्रा दासू वैद्य यांनी बालाजी सुतार यांचे पाहिले नाव सुचविले होते व त्यावर कार्यकारिणीचे एकमत झाले.
११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस दगडू लोमटे (अध्यक्ष), डॉ राहुल धाकडे (उपाध्यक्ष), गोरख शेंद्रे (सचिव),
प्रा विष्णू कावळे (सहसचिव),
प्रा शैलजा बरुरे (कोषाध्यक्ष), रेखा देशमुख (कार्यकारिणी सदस्य) अमृत महाजन (माजी सचिव), अमर हबीब (माजी अध्यक्ष) हे उपस्थित होते. तर स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार व इतर अनुपस्थित सदस्यांची या निवडीसाठी दुरध्वनी वरुन सहमती घेण्यात आली.
▪️यापुर्वीचे संमेलन अध्यक्ष
अंबाजोगाई मसाप शाखेच्या वतीने प्रति दोन वर्षांनंतर अंबाजोगाई साहित्य संमेलन घेण्यात येते. यापूर्वी झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष क्रमवारीनुसार खालील प्रमाणे आहेत.
प्रा. रंगनाथ तिवारी, डॉ. प्राचार्य शैला लोहिया, प्रा. रा. द. अरगडे, बलभीम तरकसे, प्राचार्य संतोष मुळावकर, डॉ.श्रीहरी नागरगोजे, मंदा देशमुख,
गणपत व्यास, डॉ. कमलाकर कांबळे, प्रा. दासू वैद्य. आता बालाजी सुतार.
▪️ बालाजी सुतार यांचा साहित्य.
परिचय
या संमेलनाचे अध्यक्ष हे संगणक व्यावसायिक असून शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणापासून त्यांची लेखक आणि वाचनाकडे विशेष रुची होती. गेली दोन दशकांपासून ते कविता व कथा लेखन करताहेत. त्यांच्या प्रगल्भ लेखनशैली मुळे अल्पावधीतच ते महाराष्ट्रातील प्रतिभावंत लेखकांच्या यादीत जावून बसले आहेत.
‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ हा कथासंग्रह ‘शब्द पब्लिकेशन, मुंबई’कडून प्रकाशित. अल्पावधीत चार आवृत्त्या प्रकाशित. ‘गावकथा’ या नाटकाचे लेखन आणि महाराष्ट्रभर या नाटकाचे आजवर पन्नासहून जास्त व्यावसायिक प्रयोग. याच नाटकाची दूरदर्शनकडून निर्मिती आणि सह्याद्री वहिनीवरून प्रसारण.
नवाक्षर दर्शन, मुक्तशब्द, कविता-रती, व, काव्याग्रह, मुराळी, प्रतिष्ठान या वाङ्मयीन नियतकालिकांतून आणि अक्षर, दीपावली, पर्ण, अक्षरअयान, पुणे पोस्ट, अक्षरलिपी, वाघूर, प्रतिभा, मीडिया वाॅच, मेहता ग्रंथजगत, साहित्यसूची, महाराष्ट्र टाईम्स, दिव्य मराठी, लोकमत या दिवाळी अंकांतून कथा व कविता प्रकाशित.
‘उत्तरार्ध’ या सिक्वेल-कथेला साहित्यसूची आणि राजहंस प्रकाशनाचा सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार. ‘विच्छिन्न भोवतालाचे संदर्भ’ या कथेला महाराष्ट्र टाईम्स आणि न्यूज हंट यांचा सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
एकूण काव्यविषयक जाणीवांसाठी ‘आवानओल प्रतिष्ठान, कणकवली’ यांच्याकडून ‘कविवर्य द. भा. धामणस्कर काव्य पुरस्कार’
‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथासंग्रहाला ‘मुंबई मराठी साहित्य संघा’चा ‘कथाकार शांताराम’ पुरस्कार. तर ‘नाथ समूह व परिवर्तन’ यांच्यावतीने देण्यात येणारा ‘बी. रघुनाथ स्मृती पुरस्कार’ देखील या कथासंग्रहाला मिळाला आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा ‘कथाकार बाबुराव बागुल’ पुरस्कार आणि गडहिंग्लज नगर परिषदेच्या पू. साने गुरुजी सार्वजनिक मोफत वाचनालयातर्फे देण्यात येणारा मोठी परंपरा असलेला ‘सानेगुरुजी साहित्य पुरस्कार’ या कथासंग्रहास प्राप्त झाला आहे. (हा कथासंग्रह सलग दोन वर्षे साहित्य अकादमी पुरस्काराच्या अंतिम यादीतही पोहचला होता.)
‘दोन जगातला कवी’ या कथेवर स्वप्नील कापुरे या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाकडून लघुचित्रपटाची निर्मिती ही करण्यात आली आहे.
लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, ॲग्रोवन, लोकमत, दिव्य मराठी या दैनिकांतून बालाजी सुतार यांचे नियमित / नैमित्तिक सदरलेखन असते.
■ माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट!
११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे ही
माझ्यासाठी ही अतोनात सन्मानाची गोष्ट आहे! मराठवाडा साहित्य परिषद, अंबाजोगाई शाखेचे आणि एकुणातच समस्त अंबाजोगाईचे मनःपूर्वक आभार! अशा शब्दात बालाजी सुतार यांनी या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपले मत व्यक्त केले आहे.
आपल्या मनोगतात बालाजी आपल्या मनोगतात पुढे म्हणतात की,
या शहराने, इथल्या सगळ्या सुहृद माणसांनी माझं कायम कौतुक केलं आहे, आणि ही मला सतत जबाबदारीचं भान देत राहिलेली गोष्ट आहे.
आद्यकवी मुकुंदराजांपासून- दासोपंतांपासून, शैला लोहिया-रंगनाथ तिवारींपासून, अमर हबीब यांच्यापासून दगडू लोमटे, उमेश मोहिते, दिनकर जोशी, मुकुंद राजपंखे, विष्णू कावळे यांच्यापर्यंत आणि अगदी आजवर लिहित्या असलेल्या सर्वांपर्यंतच्या (यात अनेकांचे नामोल्लेख राहिले आहेत, याची मला जाणीव होते आहे.) कवी-लेखकांनी निर्मिलेल्या अंबाजोगाईच्या, इथल्या कित्येक शतकांच्या शुभ्रधवल साहित्यपरंपरेच्या लौकिकाला उंचावण्याचा मी मनःपूर्वक प्रयत्न करेन.
संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डाॅ. दासू वैद्य, मराठवाडा साहित्य परिषद- अंबाजोगाईचे अध्यक्ष दगडूदादा आणि मसापची सर्व कार्यकारिणी, प्रस्तावित संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार आणि मसापचे (आणि व्यक्तिशः माझे) मार्गदर्शक अमरकाका या सर्वांचे मनापासून धन्यवाद त्यांनी मानले आहेत.