संतश्रेष्ठ श्री भगवानबाबा जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब सोनवणे यांची निवड
जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) – येथील संतश्रेष्ठ श्री भगवानबाबा सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी तालुक्यातील डिघोळ आंबा ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब सोनवणे यांची तर उपाध्यक्ष म्हणून प्रविण शेप व प्रशांत शेप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सदर निवडींचे मित्र परिवारासह सर्वस्तरांतून स्वागत होत आहे. दरम्यान येत्या ६ ऑगस्ट रोजी जयंती उत्सव सोहळा असून त्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जयंती उत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सोनवणे यांनी दिली आहे.
संतश्रेष्ठ श्री भगवानबाबा सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने सुप्रसिद्ध किर्तनकार समाधान महाराज शर्मा यांचे भव्य किर्तन ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता आद्यकवी मुकूंदराज सभागृहात होणार आहे. येत्या ६ ऑगस्ट रोजी संतश्रेष्ठ श्री भगवानबाबा यांची जयंती असून जिल्हाभरात त्या अनुषंगाने उत्सव साजरा करण्याची तयारी सर्वत्र सुरू झाली. याच अनुषंगाने अंबाजोगाई शहरात ही प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही जयंती उत्सव साजरा होणार आहे. उत्सव समितीच्या वतीने अध्यक्षपदी सोनवणे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर म्हणून बाळासाहेब सोनवणे सर्वदूर ओळखले जातात. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. डिघोळ आंबा ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सरपंच म्हणुन देखील ते ओळखले जातात. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे आणि भाजपा नेत्या आ.पंकजाताई मुंडे यांच्यावर त्यांची कडवी निष्ठा आहे. उत्सव समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड सर्वानुमते झाल्यानंतर मित्र परिवारात उत्साहाचे वातावरण आहे. या संदर्भात बोलताना सोनवणे म्हणाले की, संतश्रेष्ठ श्री भगवानबाबा हे आमचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या उत्सव समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सहकार्यांनी माझ्यावर टाकणे हे माझे भाग्य आहे. अंबाजोगाई शहरात अनेक वर्षांपासून जयंती उत्सव थाटामाटात साजरा करण्यात येतो. तीच परंपरा पुढे चालविताना यंदा विविध सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये रक्तदान शिबीराचा समावेश आहे. या शिबिरात १०० पेक्षा जास्त तरूण रक्तदान करतील. शिवाय सुप्रसिद्ध किर्तनकार समाधान महाराज शर्मा यांचा किर्तन सोहळा ४ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता आद्यकवी मुकूंदराज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. जयंतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी उत्सव समितीच्या वतीने भव्य जयंती मिरवणुक काढण्यात येईल. ज्या मध्ये लेझीम पथक, टाळ मृदंग आणि इतर उपक्रम ठेवण्यात आल्याची माहिती ही त्यांनी दिली. संत श्री भगवानबाबा चौक येथे भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी समाजातील ज्येष्ठांसह विविध क्षेत्रात कार्यरत अनेकांचे मार्गदर्शन सोनवणे घेत असून वेगवेगळ्या बैठकीतून जयंती उत्सवाची जोरदार तयारी सुरू असल्याचे समजते.