Nilesh lanke | हायटेक उपोषण आंदोलनातून खा.निलेश लंकेंना नेमकं काय साध्य करायचे?
भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांमुळे पोलिस कर्मचारी, शासकीय कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची होण्याची भीती
संपादकीय…
नगर : नगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी जिल्हा पोलिस दलातील स्थानिक गुन्हे अण्वेशण शाखेच्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्दयावरून पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर सुरु केलेले उपोषण पाचव्या दिवशी स्थगित केले. पोलिस महासंचालकांनी खा.लंके यांनी केलेल्या आरोपांची पंधरा दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे खा.लंके यांनी उपोषण मागे घेतले. या उपोषणादरम्यान खा.लंके यांनी एलसीबी दरमहा 27 कोटी रुपये हप्ते वसुली करत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी यादीही वाचून दाखवली. खा.लंके यांनी याआधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध दराच्या प्रश्नावर आंदोलन केले आता पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केले. एकूणच खा.लंके यांनी खासदारकीची सुरुवात झोकात झाली असली तरी त्यांच्या कार्यपध्दतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस माहित असतानाही खा.लंके यांनी त्याचदिवशी नगरमध्येच थांबून आंदोलनाचा निर्णय का घेतला हा प्रश्न उपस्थित होत आहे. संसदेत नगर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना अर्थसंकल्पासारख्या महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी, अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी ते दिल्लीत असणे गरजेचे होते. कारण अर्थसंकल्पाचे थेट परिणाम सामान्य जनतेवर होत असतात. पोलिस दलातील भ्रष्टाचाराच्या कथा कायम रंगत असतात. त्या काही फक्त नगर पुरत्या मर्यादित नाही. अशावेळी थेट देशाचा अर्थसंकल्प सोडून या प्रश्नावर हायटेक उपोषण करण्यामागे नेमका काय उद्देश आहे याची चर्चाही झाली पाहिजे. त्यातही खा.लंके यांनी या उपोषणात एका पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला व त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले. वास्तविक या गोष्टींची तक्रार ते पोलिस महासंचालकांकडे करू शकले असते. तिथे दाद मिळाली नसती तर पुढे उपोषणाचा मार्ग स्विकारणे संयुक्त ठरले असते. यातून एका खासदाराला पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्या विरोधात इतके मोठे आंदोलनाचे पाउल उचलावे लागते असे चित्र निर्माण झाले आहे. शेवटी पोलिस महासंचालकांच्या चौकशीच्या आश्वासनानंतर त्यांना उपोषण मागे घ्यावे लागले. हेच ते निवेदन किंवा तक्रार अर्ज देवूनही करू शकले असते. केवळ कथित भ्रष्टाचारा ऐवजी त्यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नी अधिक चांगले काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली असती तर उचित ठरले असते.
स्थानिक गुन्हे शाखो जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक ठेवणारी शाखा आहे. अनेक धाडसी कारवाया या शाखेने केल्या आहेत. अनेक किचकट गुन्ह्यांची उकल या शाखेच्या पथकाने शिताफीने केली आहे. अनेक वाँटेड आरोपी त्यांनी जेरबंद केले आहे. अशावेळी केवळ आरोप करून पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करून नेमके काय साधले जाणार आहे.
आंदोलन हे लोकशाहीतील महत्वाचे हत्यार आहे. उठसुठ कोणत्याही प्रश्नावर थेट आंदोलनाला बसायचं, स्वपक्षाचे बडे नेते, कार्यकर्ते आंदोलनस्थळी येतील याची काळजी घ्यायची ही मोडस ऑपरेंडी दरवेळी यशस्वी ठरणार नाही. याआधीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलगाड्या, ट्रॅक्टर आणून त्यांनी दूध दर प्रश्नी उपोषण आंदोलन केले. वास्तविक राज्य शासनाने दूध दर वाढीचा निर्णय आधीच घेतला होता. खा.लंके यांनी आंदोलन केल्यावर नवीन कोणता निर्णय झालेला नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारच्या निर्णयांची माहिती देवून खा.लंके यांना आश्वस्त केले. तेवढ्या आश्वासनावर खा.लंके यांना थांबावे लागले. या दरम्यान खा.लंके यांनी महापालिकेतही जावून अधिकाऱ्यांची बैठक घेतली व नगर शहरातील प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी जुने विषय उगळून काढत विकासकामांत खो घालण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे आता बोलले जात आहे.
हायटेक आंदोलन…
दूध दर प्रश्नी आंदोलनावेळी खा.लंके यांनी गावागावातून ट्रॅक्टर, बैलगाड्या घेवून शेतकऱ्यांना बोलावलं. जनावरं जिल्हाधिकारी कार्यालासमोर बांधली, आंदोलनस्थळीच जेवणावळी झाल्या, पंगती बसल्या…दुसऱ्या आंदोलनावेळीही असाच दिखावा पहायला मिळाला. त्यामुळे खा.लंके हायटेक आंदोलनातून दिखावा करत आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.अण्णा हजारेंचा आदर्श घ्यावा
खा.निलेश लंके हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पारनेर तालुक्यातील आहेत. अण्णा हजारे यांनी आतापर्यंत राळेगण सिध्दी ते दिल्लीपर्यंत अनेकवेळा आंदोलने केली. अनेक दिवस उपोषण केले. त्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी फक्त अण्णांच्या मागण्या असत. जेवणावेळी, ट्रॅक्टर रॅली असले काही प्रकार फारसे पहायला मिळाले नाहीत किंवा त्याची चर्चाही फारशी घडवून आणली गेली नाही. खा.लंके यांच्या आंदोलनात मात्र दिखावा अधिक आणि मुख्य मागणी बाजूला असेच चित्र दिसून आले.
संपादक : आफताब शेख