ठराविकच अवैध व्यवसाय बंद करण्याची कारवाई सुरु…
मोठमोठ्या हॉटेलवर मात्र कानाडोळा
अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नुकतीच जिल्ह्यातील पोलीस अधिकार्यांची बैठक घेऊन आपल्या हद्दीतील अवैध धंदे तातडीने बंद करण्याचे आदेश दिले. प्रत्येक पोलीस खात्यातील चौकीच्या हद्दीतील अवैध व्यवसाय तातडीने बंद करा अन्यथा कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीस प्रशासन सरसावले आणि काही धंदे बंद झाले मात्र नगर शहरांमधील काही हॉटेलमध्ये राजरोजपणे हुक्का पार्लर सुरू असून पोलिसांनी याकडे डोळेझाकपणा केला आहे.
नगर शहरातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लरमध्ये जात असून व्यसनाधीन पिढी निर्माण होत आहे. या गोष्टीला सर्वस्वी पोलीस खाते जबाबदार आहे. पोलिसांनी ठरवले तर अवैध धंदे नक्कीच बंद होतील मात्र शहरातील नामांकित हॉटेलमध्ये पोलीस अधीक्षकांनी आदेश देवूनही राजरोजपणे हुक्का पार्लर सुरूच आहे. राजकीय पुढार्यांच्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये तसेच हुक्का पार्लरमध्ये हे उद्योग सुरु आहे. याला कोण जबाबरदार याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे का? याला राजकीय पाठबळ तर नाही ना अशी चर्चा होत आहे.
अवैध दारू, मटका, जुगार, बिंगो बंद केल्याचे काही ठराविक ठिकाणीच दिसते. परंतु काही ठिकाणी राजरोजपणे हे अवैध धंदे सुरु आहे. पोलीस प्रशासन कारवाई करायला का घाबरतात? नगर शहरातील सर्वसामान्य जनता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशमुळे काही परिणाम होईल की नाही याकडे टक लावून बसले आहे. कारण अवैध दारू, मटका, जुगार, बिंगो यामुळे तरुण पिढी वाया जात आहे. खून, दरोडा, मारामार्या, चोर्या असे प्रकार हुक्का पार्लरचा असरा घेवून गुन्हेगारी वाढत आहे. मोठमोठ्या हॉटेलमधील हुक्का पार्लर कधी बंद होणार ? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.
पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार शहरात अवैध धंद्यांवर कारवाईची धडक मोहीमेमुळे तोफखाना, कोतवाली ठाण्याच्या पोलिसांच्या कारवाया सुरु आहे. पण त्या एकदम बंद होणार नाही. तर त्यासाठी सर्वच पोलीस खात्यातील कर्मचार्यांनी साथ दिली पाहिजे, अशी मागणी होत आहे. परंतु वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची स्वतः लक्ष दिले पाहिजे कारण इतर पोलिसांना हे अवैध धंदेवाले अवरत नसल्याचे दिसत आहे. या अवैध दारू, मटका, जुगार, बिंगो या धंदेवाल्यांना मोठ्या राजकीय पुढार्यांचा कार्यकर्त्यांचा तसेच संघटना, पक्ष, ग्रुप आदींचा आशीर्वाद आहे की काय ? नगर परिसरातील काही भागात बिनधास्त रात्री-बेरात्री हे धंदे सुरु आहे. हे रोखण्यासाठी याकडे लक्ष देऊन ठोस पाऊले उचलावी लागेल. तरच हे धंदे पूर्णपणे बंद होतील.
पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असल्यास त्यावर कारवाई करावी. त्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना दिले आहेत. तसेच, स्थानिक गुन्हे शाखेलाही कारवाईची मोहीम सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आढळून येईल, त्यांच्या प्रभारी अधिकार्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अधीक्षक ओला यांनी दिला आहे. हा आदेश कितपत पाळला जातो. याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले असून याबाबत उलट सुलट चर्चा देखील होत आहे.
जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात जुगारावर ७१० कारवाया झाल्या आहेत. अवैध दारू प्रकरणी २५२१, गांजा व इतर अंमली पदार्थांच्या विक्री, बाळगल्याप्रकरणी १७३ कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच, आर्म अॅक्ट अंतर्गत कट्टे बाळगल्याप्रकरणी ३१, तर इतर हत्यारे बाळगल्याप्रकरणी ११० कारवाया करण्यात आल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षात जास्त कारवाया केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, चालू वर्षात १४ सराईत गुन्हेगारांविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्ह्यात दाखल होणार्या गुन्ह्यांच्या प्रमाणात तपास पूर्ण करून गुन्हे निकाली काढण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे अधीक्षक ओला यांनी सांगितले. पण जेवढे बंद केले त्यापेक्षाही अधिक गुन्हेगारीचे प्रकार वाढल्याचे दिसते.