विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उरण येथील पीडित तरुणीच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेत नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले.
नवी मुंबईतून दोन दिवसांपूर्वी हादरवणारी घटना समोर आली आहे. यशश्री शिंदे या वीस वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. यशश्री गुरुवारपासून बेपत्ता होती.त्यानंतर शुक्रवारी रात्री तिचा मृतदेह उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या निर्जन रस्त्यावर आढळून आला. यशश्रीचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर यशश्रीच्या कुटुंबीयांनी एकच अक्रोश केला आहे. यानंतर अनेक पक्षाचे नेते या प्रकरणी पीडित तरुणीला न्याय मिळावा अशी मागणी करत आहेत शनिवार आणि रविवार स्थानिक नागरिकांनी आपला रोष या प्रकरणी व्यक्त केला होता.
उरण येथे पीडित अन्यायग्रस्त तरुणीच्या कुटुंबियांची आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या राहत्या घरी भेट घेऊन सांत्वन केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कुटुंबियांच्या सोबत असून आरोपीला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अंबादास दानवे यांनी यावेळी दिली.
नवी मुंबईतील कोपरखैरणे, नेरुळ व उरण भागात महिला व तरुणीवर झालेल्या धक्कादायक घटनांमुळे समाजात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलगती न्यायालयात चालवून कुटुंबियांना न्याय द्यावा, असे निवेदन आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना भेटून दिले. यावेळी नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे शिवसेना उपनेत्या व माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, उपनेत्या ज्योतीताई ठाकरे, उपनेत्या राजुल पटेल, उपनेत्या संजना घाडी, उपनेत्या शीतल देवरूखकर – शेठ, रेखा ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला सरचिटणीस रेखा ठाकरे उपस्थित होते.
प्रतिनिधी अनुभव भागवत मुंबई.