बाबासाहेबांमुळे झालेले सामाजिक बदल आण्णा भाऊंनी साहित्यातून मांडले – विचारवंत प्रा.डॉ.सोमनाथ कदम
सत्यशोधक डॉ.आण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त युवा आंदोलनचा उपक्रम
व्याख्यान, गुणवंतांचा सत्कार, शालेय साहित्य वाटप
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील युवा आंदोलन सामाजिक संघटनेकडून सत्यशोधक डॉ.आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांचे प्रबोधनपर व्याख्यान, गुणवंतांचा सत्कार आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे.
रविवार, दिनांक ११ ऑगस्ट रोजी विलासराव देशमुख सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमास उदघाटक म्हणून उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसिलदार विलास तरंगे आणि प्रमुख व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत प्रा.डॉ.सोमनाथ कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रशांत दहिफळे (सरपंच, बागझरी), हनुमंत गायकवाड (माजी सरपंच, तळणी), संतोष नरसिंगे (संचालक, महानिता ग्रुप), धीमंत राष्ट्रपाल (बेटी बचाव अभियान), बळीराम उपाडे (संचालक, स्वरसंध्या ग्रुप), सुंदर खाडे (युवा आंदोलन तालुकाध्यक्ष, केज) आणि आयोजक युवा आंदोलनचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष महेश जोगदंड व युवा आंदोलनचे परळी तालुकाध्यक्ष नकेश कांबळे या मान्यवरांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती. महामानवांना अभिवादन केल्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे यांनी सांगितले की, मुलांनो खूप अभ्यास करा, चांगली तयारी करा, नियोजन करून अभ्यास केला. तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तुम्ही स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतः काम करून शिका निर्व्यसनी रहा, महापुरूषांनी सांगितलेल्या विचारांवर आयुष्याची वाटचाल सुरू ठेवा असे सांगितले. तर प्रमुख वक्ते साहित्यिक, विचारवंत प्रा.डॉ.सोमनाथ कदम यांनी सत्यशोधक आण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर बोलताना अंधश्रद्धा, दैववाद, कर्मकांड या बद्दल साहित्यातील विविध दाखले देत विठू महार, चिखलातील कमळ, फकिरा, सापळा आदींसह उदाहरणे दिली. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांती, बदल आणि विधायक चळवळीचा सकारात्मक परिणाम जनमाणसांत कसा झाला हे आण्णा भाऊंनी त्यांच्या साहित्यातून मांडला आहे. जाणून बुजून हि व्यवस्था बौद्ध, मातंग यांच्या वाद तेवत ठेवण्याचे काम करीत असते. पण, बीड जिल्ह्यात चळवळ जिवंत आहे. याबद्दल समाधान व्यक्त करून व्याख्यानास अत्यंत प्रबुद्ध असा श्रोतावर्ग उपस्थित आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या २०० हून अधिक लोकांत झालेले परिवर्तन नजरेत भरणारे आहे. मानवी हक्क अभियानचे कर्मवीर एकनाथरावजी आवाड (जिजा) यांनी या भागात जी वैचारिक चळवळ अनेक वर्षे राबविली त्याचे हे फळ म्हटले पाहिजे. असे सांगून श्रोते प्रबुद्ध असले की, अधिक सडेतोड, खुले, व्यापक आणि वास्तव बोलता येते. आण्णा भाऊ यांच्या साहित्यातील परिवर्तनवादी तत्त्वज्ञान, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे गुलामगिरी मुक्तीची चळवळ, मातंग समाजाच्या समाजाच्या मागासलेपणाची कारणे, परिवर्तनाचा पासवर्ड काय ? दलित समाजातील दुभंगतेचे राजकारण, भावनिक सामाजिक व राजकीय चिकित्सा, कोणत्या गोष्टीची चिड यायला हवी, वर्तमान परिस्थिती आणि असावे लागणारे भान याविषयी प्रा.डॉ.सोमनाथ कदम यांनी अतिशय चिकित्सक व सडेतोड मांडणी केली. उपस्थित सर्वांना कदम यांनी मांडलेले विचार व भूमिका आवडली. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सर्व समाजातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. ज्यात स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या व विविध पदांसाठी पात्र ठरलेल्यांचा, नेट, सेट पात्रता धारक, इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत अशा २५ हून अधिक ज्युनिअर ते सिनिअर असणाऱ्या सर्वांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. प्रारंभी बळीराम उपाडे यांनी आपल्या दमदार आवाजात अण्णाभाऊ यांची छक्कड सादर केली. तर अध्यक्षीय समारोप करताना अशोक पालके यांनी गुणवंतांना शुभेच्छा दिल्या, तुमचे खरे आयडॉल हे आई, वडिल, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सत्यशोधक आण्णा भाऊ साठे यांच्यासारखे महामानव आहेत. तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर व्हॉट्सॲप, फेसबुकच्या अभासी दुनियेतून बाजूला या, खूप अभ्यास करा. महापुरूषांचे विचार आत्मसात करा त्यांना फक्त डोक्यावरच नाही तर डोक्यात घ्या असे आवाहन पालके यांनी केले. या प्रसंगी प्रशांत दहिफळे, हनुमंत गायकवाड, धीमंत राष्ट्रपाल यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नकेश कांबळे यांनी तर सुत्रसंचलन बळिराम पारसे यांनी केले. उपस्थितांचे आभार महेश जोगदंड यांनी मानले. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अविनाश हजारे, रेखा सरवदे, दिलीप पालके, प्रमेश्वर जोगदंड, सुशील हजारे, पिंटू कांबळे, हनुमंत रणदिवे, उत्तम हुलगुंडे व युवा आंदोलनच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.