बीड जिल्ह्यात वाढला कॉंग्रेसचा जनाधार ; तीन विधानसभा मतदारसंघावर कॉंग्रेसचा दावा – जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख
परळीची जागा काँग्रेस पक्षानेच लढवावी राज्य प्रभारी व प्रदेशाध्यक्षांकडे कार्यकर्त्यांची मागणी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने लातूर या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रभारी रमेशजी चेन्नीथला यांच्या अध्यक्षतेखाली बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनेची सध्याची स्थिती, बूथ बांधणी, बीएलए, फ्रंटल, सेलचा आढावा घेवून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी अतिशय प्रभावी आणि सकारात्मक पध्दतीने बीड जिल्ह्याची बाजू मांडत जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी बीड जिल्ह्यात कॉंग्रेसचा जनाधार दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगत बीड, गेवराई, केज आणि परळी यापैकी तीन विधानसभा मतदारसंघावर कॉंग्रेसच्या वतीने दावा करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने परळी मतदारसंघ काँग्रेसला सोडावा व तेथून काँग्रेस पक्षानेच निवडणूक लढवावी अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेशजी चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्याकडे बीड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने केली. लातूर – बीड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक नुकतीच लातूर येथे घेण्यात आली. या बैठकीसाठी बीड जिल्ह्यातून ७०० ते ८०० आजी माजी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. यात एकट्या परळी विधानसभा मतदारसंघातून शंभरहून अधिक वाहनांचा ताफा घेऊन कार्यकर्ते काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना पक्षाने प्रामुख्याने परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी विनंती व मागणी केली. या बैठकीस काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेशजी चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत व विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ.बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आ.सतेज पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष आ.वजाहत मिर्जा, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ.अमित देशमुख, काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातील गेवराई, परळी, बीड, केज विधानसभा काँग्रेस पक्षाने लढवावी अशी प्रामुख्याने मागणी बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने परळी विधानसभेची जागा काँग्रेस पक्षानेच लढवावी अशी आग्रही मागणी यावेळी बीड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेशजी चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्याकडे केली. या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यात राष्ट्रीय नेत्या खासदार सौ.रजनीताई पाटील, प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले आणि माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा जनाधार सातत्याने वाढत आहे. राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेपासून तर काँग्रेस पक्षावर जनतेचा विश्वास वाढला आहे. काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी युवा, महिला वर्ग आणि सर्व घटकांतील लोकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कार्यकर्त्यांची एक मोठी फळी निर्माण झाली आहे. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला पुर्वीपासूनच पोषक व अनुकूल वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे विजय संपादन करणे सहज शक्य झाले. लोकसभा जिंकण्यासाठी काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा आहे. तसेच पक्ष बीड, केज व परळी विधानसभा मतदारसंघात ही सातत्याने लक्षणिय कामगिरी करीत आहे. बीड जिल्ह्यातील जनतेला काँग्रेसच्या पंजा या पक्ष चिन्हाचा कधीच विसर पडणार नाही. अशावेळी कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्यासाठी जागा व संधी मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आघाडीचा धर्म पाळून राष्ट्रवादीला मदत व सहकार्य करतो. बीड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आहेत. जिल्ह्यात पक्षाचे चांगले संघटन ही आहे. मागणी केलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघावर आपली पकड असून काँग्रेस पक्षाकडून वंचित घटक, मुस्लिम, मराठा आणि बहुजन समाजातील मतदारांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेवर काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी बीड जिल्ह्यातील गेवराई, परळी, बीड आणि केज या चार विधानसभा मतदारसंघांपैकी ३ जागा काँग्रेस पक्षाने लढवाव्यात अशी मागणी बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी यावेळी केली. तर याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांनी ही सकारात्मक प्रतिसाद देत काँग्रेस पक्षाचे राज्य प्रभारी रमेशजी चेन्नीथला यांना सांगितले की, मी बीड जिल्ह्यात दोन दौरे केले आहेत. मला जाणवले की, तिथे कॉंग्रेस पक्ष मजबूत स्थितीत आहे. आज बीड जिल्ह्यात पुर्वी पेक्षाही कॉंग्रेस पक्ष संघटना ही अधिक बळकट, व्यापक झालेली आहे. हे आजच्या बैठकीसाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील जंम्बो शिष्टमंडळाच्या उपस्थिती वरूनच दिसून येत आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या आगामी जागा वाटपामध्ये विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा लढण्यासंदर्भात काँग्रेस पक्ष दावा करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले. या आढावा बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत तपशीलवार, मुद्देसूद संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडीच्या बीड जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे, नवनाथ बापू थोटे, जेष्ठ नेते प्रवीणकुमार शेप, महावीर काका मस्के, परळी शहराध्यक्ष बहादूर भाई, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष ईश्वर शिंदे, परळी तालुकाध्यक्ष प्रा.अनिल जाधव, माजलगाव तालुकाध्यक्ष नारायणराव होके, केज तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे, शिरूर तालुकाध्यक्ष रमेश सानप, बीड तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे, गेवराई तालुकाध्यक्ष महेश बेदरे, पाटोदा तालुकाध्यक्ष राहुल जाधव, आष्टी तालुकाध्यक्ष रवी काका ढोबळे, युवक जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेद्रे, परळी विधानसभा अध्यक्ष रणजित भैय्या देशमुख, ऍड.प्रकाश मुंडे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष मिनाक्षीताई पांडुळे, जिल्हाध्यक्ष विष्णू मस्के, ईश्वर सोनवणे, दत्ताभाऊ गव्हाणे, शिवाजीराव देशमुख, प्रकाशराव देशमुख यांनी व्यक्त केला.