अहमदनगर ब्रेकिंग : शहरातील बेशिस्त वाहतुकीविरोधात पोलिस अधीक्षक उतरले रस्त्यावर
प्रोफेसर चौकात तोफखाना पोलिसांसह सुमारे दीड तास केली नाकाबंदी
नगर – दुचाकी वाहने अस्ताव्यस्त, ट्रिपल सीट आणि विना परवाना चालवून तसेच विद्यार्थिनींना कट मारून त्यांची छेडछाड काढणाऱ्या काही टुकार तरुणांविरोधात कोतवाली पोलिसांच्या पाठोपाठ तोफखाना पोलिसांनीही कारवाईचा बडगा उगारला आहे. तोफखाना पोलिसांच्या या मोहिमेत स्वत: जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला हे ही रस्त्यावर उतरले व शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी अतिशय वर्दळ असलेल्या प्रोफेसर कॉलनी चौकात सुमारे दीड तास नाकाबंदी करत अनेक वाहनांवर कारवाई केली.
शहरातून मोकाट आणि वेगात वाहने चालवून नागरिकांना त्रास देणे, अल्पवयीन शाळकरी मुलींना दुचाकीने कट मारणे, छेडछाड करणे, विना परवाना दुचाकी चालवणे,परवाना नसताना ट्रिपलशीट गाडी चालवून अपघातासारखी परिस्थिती निर्माण करणे अशा अनेक घटना पोलिसांच्या निदर्शनास येत होत्या.याबाबत तशा तक्रारीही नोंदवण्यात आल्या होत्या. या शिवाय सावेडी उपनगर परिसरात चेन स्नॅचिंग तसेच मोटारसायकल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांना आला घालण्यासाठी तोफखान्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी अचानक पोलिस कर्मचाऱ्यांना अतिशय वर्दळ असलेल्या प्रोफेसर कॉलनी चौकात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. सायंकाळी ६ वाजेपासून तेथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली.
या दरम्यान पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पो.नि.साळवे यांना फोन केला. त्यावेळी त्यांनी याबाबतची माहिती अधीक्षक ओला यांना दिली असता ते ही तातडीने प्रोफेसर कॉलनी चौकात दाखल झाले व स्वत: रस्त्यावर उतरून त्यांनी वाहनांच्या तपासण्या सुरु केल्या. काही वेळाने त्यांनी शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही त्या ठिकाणी वायरलेस यंत्रणेवर संदेश देत बोलावून घेतले. सुमारे दीड तास अनेक वाहनांची तपासणी करत ट्रिपल सीट, विना परवाना वाहन चालविणे, वाहनांचे कागदपत्रे उपलब्ध नसणे, फॅन्सी नंबर प्लेट असलेली वाहने अशा जवळपास ८० पेक्षा जास्त वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी सांगितले.
सदरची कारवाई पो.नि. मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तानाजी कानगुडे, पोलिस अंमलदार रमेश शिंदे, अतुल लगड, रविंद्र खेडकर, अविनाश दाताळ, सुनिल भरते, महिला पोलीस कर्मचारी एस.डी.शेलार, वर्षा कदम पोलिस अधीक्षकांचे आरटीपीसी ए.बी.गर्जे आदींच्या पथकाने केली आहे.