अहमदनगर : चिमुकल्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे: पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव
वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करा : पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस, रिक्षाचालकांना सूचना
अहमदनगर – कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व शाळांमध्ये शिकत असलेल्या लहान विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस आणि रिक्षाचालकांची बैठक काल रोजी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बोलावली होती. कोणत्याही चिमुकल्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक चालकाने वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्कूल बसेस व रिक्षा चालकांना केले.
कोतवाली पोलीस ठाण्यात हद्दीतील शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करणाऱ्या स्कूल बस तसेच रिक्षाचे चालकांची बैठक पोलीस ठाण्यात बोलावण्यात आली होती. या बैठकीत पोलीस निरीक्षक यादव यांनी चालकांना काही सूचना केल्या. वाहन चालविण्याचा परवाना त्यासोबतच प्रादेशिक परिवहन विभागाची सर्व कागदपत्रे चालकाकडे असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसेच, वाहनावर नंबर प्लेट दोन्ही बाजूने स्पष्ट दिसेल अशा लावाव्यात. वाहनाचा विमा काढलेला असावा. मुलांची ने-आण करताना वाहनात केअर टेकर असावा. चालक हा निर्व्यसनी असावा. तसेच, शाळेतील मुलींची छेडछाड होणार नाही, याची खबरदारी चालकाने घ्यावी, अशा महत्त्वाच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या. सर्व चालकांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. यावेळी दिलीप गलांडे, संजय आव्हाड, सलीम शेख, शिवाजी उबाळे, चांद सय्यद, देविदास लोंढे, दिनेश मैहेत्रे, गणेश मोरे, आतिश खामकर, प्रकाश कोटकर, जगन्नाथ बहिरवाडे आदींची उपस्थिती होती.
………………………
दारू पिऊन वाहन चालविल्यास कठोर कारवाई होणार
आई-वडील मुलांना मोठ्या विश्वासाने स्कूल बस व रिक्षातून शाळेत पाठवीत असतात. त्यामुळे चुकीचे वर्तन करून कोणत्याही चिमुकल्याचा जीव धोक्यात घालू नका. कोणत्याही चालकाने दारूच्या नशेत वाहन चालू नये. तसे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक यादव यांनी दिला.