प्रतिनिधी : विधानसभेचे अधिवेशन आज नगर शहरासाठी महत्त्वपूर्ण ठरले. सकाळच्या सत्रात सभागृहात विविध मुद्द्यांवरती चर्चा सुरू असताना काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी सदर चर्चा थांबवून स्तगन प्रस्ताव मांडून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावेडी हत्याकांडाच्या मुद्द्यावरून चांगलेच घेरले. यावर फडणवीस यांना उत्तर द्यावे लागले. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी या हत्याकांडा बाबत विधानसभेमध्ये आवाज उठवण्याची दूरध्वनीवरून चर्चा करत सोमवारी सकाळी थोरातंकडे नगरकरांच्या वतीने मागणी केली होती.
सावेडी हत्याकांड आणि हिंदुत्ववादी चळवळीत काम करणाऱ्या ओंकार भागानगरे हत्याकांडावर थोरात यांनी यावेळी आक्रमक होत सरकारवर जोरदार तोफ डागली. थोरात यावेळी म्हणाले की, शनिवारी रात्री दहाच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यामध्ये सावेडी येथे एक हत्याकांड झालं. यामध्ये अंकुश चत्तर नावाचा युवक जो राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे त्याची हत्या झाली. आठ – दहा लोक आले. त्याच्या डोक्यात मारलं. सगळे उपस्थित गुन्हेगार कोण होते हे सगळ्यांनी पाहिलेल आहे.
यापूर्वीसुद्धा ओंकार भागानगरे नावाच्या युवकाची हत्या झाली. आता परत दुसरी हत्या झाली. जो गुन्हेगार आहे तो सत्ताधारी पक्षाचा आहे. गृहमंत्री सत्ताधारी पक्षाचे आहेत. खासदारही सत्ताधारी पक्षाचे आहेत. शहराचे आमदार आता सत्ताधारी पक्षाकडे गेलेले आहेत. जनतेला असं वाटत आहे की, सत्तेकडून त्यांना आधार मिळतोय की काय. संरक्षण मिळते की काय. तशी अहमदनगर मध्ये भावना निर्माण झाली आहे, असे म्हणत थोरात यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
गृहमंत्री फडणवीस यांना संबोधून थोरात म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री इथे उपस्थित आहेत. गुन्हेगाराला जात नसते. गुन्हेगाराला धर्म नसतो. गुन्हेगाराला पक्ष सुद्धा नसतो. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. नगरमध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे. याचा कुठेतरी तुम्ही बंदोबस्त केला पाहिजे. सरकार म्हणून एक अस्तित्व असतं. हे दाखवण्याची जबाबदारी आली आहे. लोक भयभीत आहेत. अत्यंत अस्थिर, अशांत वातावरण आहे. या मुद्द्यावर गृह विभागाची चर्चा घडवून आणण्याची अपेक्षा मी करतो.
गृहमंत्री फडणवीस यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांनी जो विषय मांडला आहे, त्याबाबत मी त्यांना अश्वस्त करतो की, गुन्हेगाराचा जात, धर्म, पक्ष न पाहता त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि या सभागृहात त्याचे निवेदन देखील ठेवले जाईल. शहर काँग्रेसने सावेडी हत्याकांडावरून विधानसभेत हल्लाबोल केल्यानंतर किरण काळे म्हणाले की, राष्ट्रवादी गद्दार गटाच्या शहराच्या आमदारांनी वास्तविक पाहता या प्रश्नावर सभागृहात आवाज तत्परतेने उठवायला पाहिजे होता. त्यांच्या पक्षाच्या सदस्यांनी यावर सरकारवर हल्लाबोल करायला पाहिजे होता.