अहमदनगर ब्रेकिंग : मातंग समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रमोद वाघमारे यांच्यावर प्राणघातक हल्ला ; घटनेनंतर हल्लेखोर झाले फरार !
शासनाच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांना समजावून सांगणं, अडीअडचणीत असलेल्यांना योग्य मार्गदर्शन करणं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या महामानवाच्या जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करणे त्याचप्रमाणे समाजातल्या अनेकांना योग्य असा सल्ला देण्याचे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गंगाधर वाघमारे यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला.
काल अर्थात सोमवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी दोन वाजता अहमदनगर एमआयडीसी परिसरातल्या शासकीय दूध डेअरीजवळ ही घटना घडली. हल्यानंतर दोघे हल्लेखोर फरार झाले. लोखंडी वस्तूने त्या दोघांनी वाघमारे यांच्यावर हल्ला केला. मात्र या हल्ल्याचे कारण वाघमारे यांनासुद्धा समजू शकलं नाही. या हल्ल्यामागे कोण आहे, याचा तपास एमआयडीसी पोलिसांनी लावावा, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.
अहमदनगर शहर परिसरात प्राणघातक हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. हे हल्ले कशासाठी होत आहेत, यामागे कोण कोण आहेत, या हल्लेखोरांना कोणाचा वरदहस्त आहे, याचा तपास पोलिसांनी लावावा आणि हल्लेखोरांना लवकरात लवकर जेरबंद करावं, अशी मागणी अहमदनगर जिल्ह्यातल्या तमाम दलित बांधवांच्यावतीनं करण्यात येत आहे.