नगरमध्ये रस्त्यावर उतरून पाहणी…शहरातील कायदा- सुव्यवस्था बिघडली असून याचे पडसाद विधीमंडळातही उमटले आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश शहर पोलिसांना दिले आहेत. ते स्वत: सोमवारी रात्री रस्त्यावर उतरले. त्यांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून दारू पिऊन वाहने चालविणार्यांसह सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणार्यांवर कारवाई केली आहे.
रात्री 11 वाजेनंतर हॉटेल, परमीट व इतर आस्थापना सुरू असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. दोन वेळा कारवाई केल्यानंतर तिसर्यांदाही संबंधित हॉटेल, परमीट रूम सुरू असल्यास त्यांचा परवाना रद्द करण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्याबाबत पोलिसांना आदेश दिले असल्याचे अधीक्षक ओला यांनी सांगितले.