अहमदनगर ब्रेकिंग : कोतवाली पोलिसांकडून २७ गोवंशीय जनावरांची सुटका
झेंडीगेट परिसरात पुन्हा एकदा कारवाई ; दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
अहमदनगर – गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या पिकअपला कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट परिसरात सापळा लावून पकडले आहे. या कारवाईत २७ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून दोन लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुलाब बनीलाल शेख (वय ३३ वर्षे, रा.खंड ता. कर्जत, जि. अहमदनगर), मोहम्मद गौस फकीर महोम्मद कुरेशी (रा.बेपारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमनगर) या दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती की, शहरातील झेंडीगेट परिसरातील आंबेडकर चौकाजवळ गोवंशीय जनावरांना क्रूरपणे कत्तल करण्यासाठी वाहतूक होत आहे. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलीसांनी सापळा लावून १९ जुलै २०२३ रोजी रात्री दोन वाजता पिकअप पकडला असून २७ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल दिपक भागुजी रोहकले यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक लाख ५० हजार रुपये किमतीचा बोलेरो पिकअप (एम एच १७८बीडी ४०७०), तीस हजार रुपये किंमतीच्या दोन जर्सी गायी, पंचविस हजार रुपये किमतीची २५ जर्शी गाईची वासरे असा दोन लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन, मनोज कचरे, चापोहेकॉ भांड, पोना शाहीद सलीम शेख, प्रमोद लहारे, सुमीत गवळी, दिपक रोहकले, जरे यांनी ही कारवाई केली आहे.