अहमदनगर : अमित ठाकरे यांच्या दाैऱ्याची मनविसेकडून जय्यत तयारी
दौरे, सभा अनेक नेत्यांच्या होत असतात. परंतु, राज ठाकरे स्वतः येणार, त्यांची सभा होणार म्हटल्यावर जनतेची उत्कंठा शिगेला पोहोचते. अगदी तशीच क्रेझ त्यांचे चिरंजीव युवा नेते अमित ठाकरे यांची आहे. नगरमध्ये कोणत्या ना कोणत्या पक्षाचे नेते येत असतात. यावेळी मात्र खुद्द अमित ठाकरे प्रथमच नगरमध्ये येणार आहेत. राज्यातील सर्वात स्टायलिश राजकीय नेतृत्व म्हणून ते प्रसिद्ध आहेतच, सोबत राजकारणाची ठाकरे शैली त्यांच्याकडे आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष म्हणून अमित ठाकरे यांचा आठव्या टप्प्यातील उत्तर महाराष्ट्राचा दाैरा सुरू झाला आहे. या दौऱ्यात ते मनविसेची पुनर्बांधणी करणार आहेत. या आठव्या टप्प्यात अमित ठाकरे हे नगर दाैऱ्यावर येणार आहेत. नगर शहरात 22 जुलै रोजी तर शिर्डी येथे 23 जुलैला असतील, अशी माहिती मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिली.
मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या दौऱ्याचा प्रमुख उद्देश महाविद्यालयीन युवकांशी संवाद साधणे हा आहे. विशेषतः नगरमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्याचा हेतू आहे. राज्याच्या राजकारणात कोणते बदल झाले पाहिजे, तसेच सामाजिक स्तरावर युवकांचे काय प्रश्न आहेत, कोणत्या मागण्या आहेत, ते जाणून घेतले जाईल. त्या दृष्टीने संवाद मेळाव्याचे सर्व नियाेजन मनविसेने केले असल्याचे सुमित वर्मा यांनी सांगितले. मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या संवाद मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी 9860521022 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मनविसे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केले आहे.
मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी आठ वाजता नगरच्या दिशेने निघतील. नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे दहा वाजता शनी मूर्तीचे दर्शन घेतील. यानंतर ते नगरच्या दिशेने रवाना हाेतील. नगर तालुक्यातील शेंडी बायपास येथे साडेअकरा वाजता मनविसे पदाधिकारी त्यांचे भव्य स्वागत करणार आहेत. त्यानंतर अमित ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी इंपिरिअल चाैकात दुपारी बारा वाजता येतील. येथे मनविसे पदाधिकारी त्यांचे भव्य स्वागत करणार आहेत. यानंतर शासकीय विश्रामगृहावर येथे उपस्थित विद्यार्थ्यांबराेबर दुपारी तीन वाजेपर्यंत ते संवाद साधतील. तसेच मनविसेचे जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होईल. युवा नेते अमित ठाकरे यांच्याबराेबर संदीप पाचंगे, महेश ओवे, अखिल चित्रे, सायली साेनावणे, किर्तीकुमार शिंदे हे मुंबईतील पदाधिकारी देखील असणार आहेत, अशी माहिती सुमित वर्मा यांनी दिली. मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा हा दाैरा अहमदनगरच्या राजकारणावर आगामी काळात सकारात्मक परिणाम करणारा ठरेल, असे हे नियाेजन आहे, असे सुमित वर्मा यांनी सांगितले.
मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा हा नगरमधील पहिलाच दाैरा आहे. हा दाैरा यशस्वी हाेण्यासाठी मनविसे पदाधिकारी मेहनत घेत आहेत. दाैरा नियाेजित वेळेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी मनविसेच्या आतापर्यंत अनेक बैठका झाल्या आहेत. मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, वकील अनिता दीघे, मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नगर तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड, अनिकेत शियाळ, स्वप्नील वाघ, संकेत जरे, प्रमाेद ठाकूर, तुषार हिरवे, संताेष साळवे, संदीप चाैधरी आणि इतर पदाधिकारी दाैरा यशस्वीतेसाठी मेहनत घेत आहेत, असे मनविसे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी सांगितले.