अहमदनगर ब्रेकिंग : ओंकार घोलपवर एम.पी.डी.ए.ची कारवाई करावी
अनेक गुन्ह्यांमध्ये जामीन न घेता फरार असल्याचा आरोप
पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या व काही गुन्ह्यात फरार असलेला ओंकार रमेश घोलप हा शहरात दहशत निर्माण करीत असल्याने त्याला अटक करण्याची व झोपडपट्टी दादा निर्मूलन (एम.पी.डी.ए.) कायद्यान्वये त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी शरद अनंत जोशी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ओंकार घोलप व त्याचे साथीदारांवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये फरारी असताना न्यायालयातून जामीन न घेता तो मोकाटपणे शहरात फिरत आहे. शहरात दहशत निर्माण करण्याचे काम केले जात आहे. शहराच्या कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
घोलप व त्याचे साथीदार पोलीस प्रशासनाला न घाबरता शहरात वावरल्यास सणासुदीच्या काळात समाजात अशांतता निर्माण करुन जातीय दंगली घडवून आणू शकत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर घोलप व त्याच्या साथीदारांवर यापूर्वी अनेक पोलीस स्टेशन मध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे म्हणजेच खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्ट, खंडणी, दरोडा तसेच जातीय दंगली घडवून आणल्याबाबतचे गुन्हे दाखल असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शहरात जातीय दंगली होवू नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी घोलप याला अटक करुन त्याच्यावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी जोशी यांनी केली आहे.