मारहाण करून पिस्तूल दाखविणारे काही तासांतच कोतवाली पोलिसांच्या ताब्यात
चार जणांवर गुन्हा दाखल ; वाहन जप्त
अहमदनगर : वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून हाताने मारहाण करून पिस्तूल दाखविणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी काही तासात ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आदित्य संजय राठोड (वय २५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांवर गुन्हा दाखल झाला असून, कोतवाली पोलिसांनी आरोपींना निष्पन्न करून रात्री आकरा वाजता सुमारास दोघांना ताब्यात घेतले आहे.
प्रतीक बळवंतराव ठुबे (वय ३२ रा. आगरकर मळा, अहमदनगर), स्वप्निल प्रकाश रोडे (वय ३३ रा. भूषणनगर केडगाव, अहमदनगर), कैलास शिवाजी शिंदे (रा. हंगा,ता.पारनेर, अहमदनगर) अशी निष्पन्न झालेल्याची नावे आहेत. यातील प्रतीक ठुबे आणि स्वप्निल रोडे या दोघांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आदित्य राठोड हे पुणे येथून अहमदनगरकडे येत असताना कायनेटिक चौकात मंगळवारी साडेसात वाजता वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून त्यांना काही जणांनी अडविले. दोन जणांनी शिवीगाळ करत राठोड यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने जवळीत पिस्तूल राठोड यांना दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपींकडील वाहन (MH १६ BY १५८५) कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदिप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.