अहमदनगर : व्यापाऱ्यांसाठी मध्यवर्ती बाजारपेठेतील पोलीस चौकी सुरू करण्याची काँग्रेस मागणी करणार – किरण काळे
प्रतिनिधी : मध्यवर्ती बाजारपेठेतील सराफ बाजारा लगत असणाऱ्या पोलीस चौकीला चक्क कुलूप लागले आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी संवाद साधून या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी पोलीस चौकी सुरू करण्याची गरज असल्याची मागणी काळे यांच्याकडे केली. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत येणारी ही पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन करण्यात येईल. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन यावेळी काळे यांनी व्यापाऱ्यांना दिले.
सराफ बाजारात मोठ्या संख्येने सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तूंची दुकाने आहेत. तसेच या परिसरात असणारा गंज बाजार, महात्मा फुले भाजी मार्केट, मोची गल्ली, सारडा गल्ली असा व्यापाऱ्यांच्या दुकानांनी गजबजलेला मध्यवर्ती बाजारपेठेचा मोठा परिसर आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी दुकाने आहेत. शहराच्या विविध भागातून तसेच ग्रामीण भागातून ग्राहक बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गर्दी करत असतात. सणासुदीच्या काळात बाजारपेठेत प्रचंड गर्दी होत असते. व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच बाजारपेठेत काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांची तात्काळ मदत मिळण्याच्या दृष्टीने पोलीस चौकी कार्यान्वित असणे आवश्यक असल्याचे यावेळी व्यापाऱ्यांनी काळे यांना सांगितले.
यावेळी बोलताना काळे म्हणाले की, पूर्वी ही पोलीस चौकी सुरू होती. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ती बंद आहे. कोतवाली पोलीस स्टेशन दूर अंतरावर असल्यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने तिथपर्यंत पोहोचणे गैरसोयीचे आहे. व्यापारी, ग्राहक, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व अनुचित घटनांच्या प्रसंगी तातडीने मदत मिळण्या करिता बंद पडलेली पोलीस चौकी व्यापारी बांधवांची गरज लक्षात घेता पुन्हा कार्यान्वयीत करणे गरजेचे आहे. याबाबत लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन सदर पोलीस चौकी कार्यान्वित करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने केली जाईल.
यावेळी माजी नगरसेवक संजय झिंजे, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, काँग्रेसच्या उद्योग व व्यापार आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष मनसुख संचेती, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, केडगाव विभाग प्रमुख विलास उबाळे, जयराम आखाडे आदींसह व्यापारी उपस्थित होते.
फोटो ओळी : मध्यवर्ती बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी संवाद साधला. बंद अवस्थेत असणाऱ्या पोलीस चौकीची यावेळी त्यांनी पाहणी केली.