अहमदनगर : कोणी आमचा पाठलाग केला; रस्त्यात अडवले तर काय करावे…?
मुलींच्या प्रश्नांना पोलीस निरीक्षकांची उत्तरे
छेड काढणाऱ्याची तक्रार करा त्याला धडा शिकवू : पोलीस निरीक्षक यादव
कोतवाली पोलीस निरीक्षकांनी मुलींना दिले स्वसंरक्षणाचे धडे
पॉलिटेक्निक कॉलेज आणि गुगळे हायस्कुल येथे महिला सशक्तिकरण व स्वसंरक्षण मार्गदर्शन कार्यक्रम
अहमदनगर : मुलींनो तुम्हाला कोणाकडून त्रास होत असेल, कोणी छेड काढत असेल तर तुम्ही फक्त न घाबरता तक्रार करा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, आपले नाव गोपनीय ठेवले जाईल असा विश्वास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विद्यार्थिनींना दिला. माळीवाडा येथील गुगळे हायस्कुल व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे आयोजित मुलींसाठी स्वसंरक्षण मार्गदर्शन कार्यशाळेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव बोलत होते.
मुलींनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना काही प्रश्न विचारले असता यादव यांनी मुलींना आपुलकीने उत्तरे देऊन स्वसंरक्षण कसे करता येईल, याचे मार्गदर्शन केले. शाळेत जाता-येताना कोणी त्रास देत असेल तर काय करायचे, रिक्षा चालकांसह अन्य कोणी त्रास देत असल्यास काय करावे यासह अनेक प्रश्न मुलींनी यादव यांना विचारले. प्रश्नांची उत्तरे देत मुलींना कोणी त्रास देत असेल तर त्यांना अजिबात सोडणार नसल्याचे यादव यांनी सांगितले. शिशु संगोपन संस्थेचे उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव रं.धो. कासवा, प्राचार्या कांचन गावडे, पर्यवेक्षक प्रा. संजय शेवाळे, पोलीस कर्मचारी पांढरकर, योगेश खामकर, शिवाजी मोरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकत्तेर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कार्यक्राचे सूत्रसंचानक अशा वरखडे यांनी केले तर आभार प्रा. सुभाष चिंधे यांनी मानले. शासकीय तंत्रनिकेतन येथे झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य. बाळासाहेब कर्डिले, डी.डी.अहिरराव, एस.आर.देशमुख, डॉ. बी सी खरबस, अनिता पाटील, आर जे चव्हाण, ए बी कर्डक, वाय.एम. दांदळे, ए. व्ही शिदोरे, एस.एस. पाटील, डी.के.माने, देवेंद्र पांढरकर आदी उपस्थित होते.
………………………………….
मुलींनी विचारलेल्या प्रश्नांना पीआय यादव यांची उत्तरे..
प्रश्न – रस्त्याने कोणी अडवलं तर काय करावे..?
पीआय यादव – काही वेळा रस्त्याने कोणी अडवले तर तुम्ही भीतीपोटी त्याची तक्रार करत नाही आणि त्यामुळे समोरचा व्यक्ती पुन्हा त्रास देतो. रस्त्यात कोणी अडवणूक करून त्रास दिल्यास आधी आजूबाजूच्या लोकांना जो त्रास देत असेल त्याची माहिती द्या. तात्काळ ११२ डायल करून पोलिसांची मदत मिळवा. घरी गेल्यानंतर आई-वडिलांना याची माहिती देऊ जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्या.
प्रश्न – रिक्षावाल्याने गैरवर्तन केलं तर..?
पीआय यादव – तुम्ही रोज रिक्षाने किंवा शाळेच्या बसने शाळा कॉलेजमध्ये ये-जा करता. शाळेत येत असताना रिक्षा चालकाने किंवा इतर कोणी गैरवर्तन केले तर न घाबरतात त्याची तक्रार आपल्या शिक्षकांकडे आधी करा.
प्रश्न – गुड टच आणि बॅड टच कसा ओळखावा..?
पीआय यादव – आईने प्रेमाने मिठी मारणे, जवळच्या व्यक्तीने शाबासकी देणे म्हणजे गुड टच. तर एखादी व्यक्ती आपल्याला वाईट हेतूने स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. शरीराच्या कोणत्याही भागावरून वारंवार हात फिरवणे म्हणजे बॅड टच अर्थात वाईट स्पर्श. अशा स्पर्शाने आपल्याला भीती वाटते, अस्वस्थ वाटते. आपल्या एखाद्या अवयवाला स्पर्श करून कोणाला सांगू नको असे सांगितले जात असेल तर तो वाईट स्पर्श आहे. असे कोणी केल्यास न घाबरतात तात्काळ आई-वडिलांना याची माहिती द्या. खरंतर निसर्गानेच महिलांना असा टच ओळखण्याची नैसर्गिक कला दिलेली आहे.
प्रश्न – रस्त्याने कोणी पाठलाग केला तर काय करावे..?
पीआय यादव – शाळेत-कॉलेजमध्ये जाताना किंवा येताना कोणी पाठलाग करत असेल असे लक्षात आल्यास ११२ कॉल करून पोलिसांची मदत घ्या, याची माहिती आपल्या शिक्षकांना किंवा घरच्यांना आधी द्या. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार करून पाठलाग करणाऱ्याला पोलिसांच्या हवाली करा.
प्रश्न – कोणी आमचे फोटो काढले तर काय करायचे..?
पीआय यादव – काही वेळा त्रास देण्यासाठी टवाळखोर मुलं तुमचे फोटो काढतात. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तुमच्याशी गैरवर्तन करतात. अशावेळी घाबरून न जाता घरी याची माहिती द्या. फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असल्याची तक्रार तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात द्या. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
प्रश्न – सोशल मीडियावरून कोणी मेसेज पाठवत असल्यास काय करावे?
पीआय यादव – सोशल मीडिया हाताळताना पहिले तर तुम्हीच स्वतःहून काळजी घेतली पाहिजे. जी व्यक्ती ओळखीतील नाही त्याची रिक्वेस्ट एक्सेप्ट करू नका. त्याच्या कोणत्याही मेसेजला उत्तर देऊ नका. एखाद्याने वारंवार मेसेज पाठवल्यास पोलीस ठाण्यात येऊन तक्रार करा. विनाकारण मेसेज करून त्रास देत असल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल होतो.