अहमदनगर : छेड काढणाऱ्यांची तक्रार द्या, नाव गोपनीय ठेवले जाईल : पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव
चांद सुलताना महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सोशल मीडियाच्या वापराबाबत दिल्या सूचना
अहमदनगर : घरी किंवा महाविद्यालय परिसरात कोणी त्रास दिल्यास संबंधित व्यक्तीची तक्रार निर्भयपणे पोलिसांना द्या, छेड काढणाऱ्यावर तातडीने कारवाई केली जाईल, अशा सूचना चांद सुलताना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिल्या. तसेच, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यास बदनामी होईल, या भीतीमुळे काही मुली तक्रार करत नाहीत. त्यामुळे असे न करता छेड काढणाऱ्याची तक्रार द्या, तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक यादव यांनी सांगितले.
चांद सुलताना विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कायद्याबाबत व सायबर गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. छेडछाड, पाठलाग करणे, मोबाईल वरून त्रास देणे असे प्रकार होऊ नये, यासाठी चंद्रशेखर यादव यांनी मुलींना काही सूचना केल्यात. कुणीही छेड काढल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार द्यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे यादव म्हणाले. मोबाईल वरून विनाकारण मेसेज करणे, पाठलाग करणे, छेड काढणाऱ्याची तक्रार पोलिसांना द्यावी. पोलिस स्टेशनच्या ०२४१ २४१६११७ किंवा ११२ या मदत क्रमांकावर संपर्क करून माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावेळी चांद सुलताना विद्यालयाचे सय्यद अब्दुल मतीन अ.रहीम , सय्यद असगर, मौलाना शफिक काशमी, शफी तांबोळी, हुंडेकरी अली, प्राचार्य एस.एम. शमी इमाम यांच्यासह पोलिस अंमलदार योगेश खामकर, प्रशांत बोरुडे उपस्थित होते.
सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा..
सोशल मीडिया वापरत असताना काही वेळा मुलींच्या व इतर बाबतीत चुकीच्या पोस्ट केल्या जातात अथवा फॉरवर्ड केल्या जातात. त्यांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागते आणि त्याचा शैक्षणिक जीवनावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे सोशल मीडिया हाताळत असताना कोणताही चुकीचा मजकूर पोस्ट करू नये, फॉरवर्ड करू नये… असे पोलीस निरीक्षक यादव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.