अहमदनगर ः रस्ते चौपदरीकरणासाठी गडकरींकडे पाठपुरावा करू : शिवाजी कर्डिले… आगडगाव येथे भैरवनाथ जन्मोत्सव उत्साहात
अहमदनगर ः ‘‘आगडगाव येथील काळ भैरवनाथ देवस्थानामुळे नगर ते आगडगाव या रस्त्यावर वाहतुक वाढली आहे. परिसराचा विकास होत आहे. त्यामुळे आगडगावला जोडणारे सर्व रस्ते चौपदरीकरण करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करू,’’ असे आश्वासन माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिले.
आगडगाव येथे काळ भैरवनाथ जन्मोत्सव उत्साहात झाला. या वेळी आयोजित कार्यक्रमात कर्डिले बोलत होते. ‘भाजयुमो’चे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, गौरव भंडारी, वृंदावननिवासी राधिका श्रीजी तसेच मान्यवर या वेळी उपस्थित होते. अन्नदाते, मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. देवस्थानाचे अध्यक्ष बलभीम कराळे यांनी वर्षभरातील जमाखर्च वाचून दाखविला. उपाध्यक्ष साहेबराव गायकवाड, सचिव त्र्यंबक साळुंके, खजिनदार दीपक गुगळे, सल्लागार मुरलीधर कराळे, विश्वस्त नितीन कराळे, तुलशीदास बोरुडे, गोरक्षनाथ जाधव, संभाजी कराळे, दिलीप गायकवाड, चंद्रकला खाडे यांनी मान्यवरांचा गौरव केला. पंचायत समितीचे विस्ताराधिकारी चंद्रकांत खाडे यांनी उपक्रमांची माहिती दिली. शांतीभाऊ मेमोरिअल ट्रस्ट यांच्या वतीने देवस्थानाला मालवाहतुक टेम्पो भेट देण्यात आला. त्याची चावी माजी मंत्री कर्डिले यांच्याहस्ते फिरोदिया यांनी देवस्थानाला दिली. मान्यवरांच्या हस्ते भैरवनाथांची महापूजा करण्यात आली.
फिरोदिया म्हणाले, की भैरवनाथांची महती मोठी आहे. येथे दिलेले दान सत्कारणी लागते याचा आनंद आहे. देवस्थानाला वर्षभर पुरेल ऐवढे तेल दिले जाईल. यापुढीही काही गरज असल्यास आपण साह्य करू.
अक्षय कर्डिले यांचे या वेळी भाषण झाले. मागील सात दिवस आयोजित सप्ताहात राधिका श्रीजी यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवपुराण कथा कथन करण्यात आली. या वेळी रोज येत असलेल्या भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली.