6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिन नसून ‘दर्पण’ चे स्मरण म्हणून पत्रकार दिन, ‘दर्पण’ दिन म्हणून साजरा करावा
मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे मराठी पत्रसृष्टीला आवाहन
मुंबई- 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू केले.. त्याचे स्मरण म्हणून आपण महाराष्ट्रात 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन किंवा दर्पण दिन म्हणून साजरा करतो.. गुगलवर यासंदर्भात चुकीची माहिती दिलेली आहे.. 6 जानेवारी रोजी बाळशास्त्रींचा जन्म दिन असल्याने तो दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो असं गुगलवर दिसतंय.. त्याचा आधार घेत आपल्यापैकी अनेकजण 6 जानेवारीला बाळशास्त्रींची जयंती असते असा समज करून बसलेले आहेत. हे पूर्ण चुकीचे आहे..याला कुठलाही आधार नाही.. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1812 रोजी पोंभुर्ले येथे झालेला आहे.. सरकारने एक जीआर काढून ही तारीख नक्की केलेली आहे.. बाळशास्त्रींचा मृत्यू 17 मे 1848 रोजी झालेला आहे.. राज्यातील तमाम पत्रकारांना विनंती आहे की, 6 जानेवारी रोजी बाळशास्त्रींची जयंती नाही तो दर्पण दिन, पत्रकार दिन आहे.. बातम्या टाकताना याची नोंद घ्यावी.. बाळशास्त्री जांभेकर यांचे वेगवेगळे चार फोटो गुगलवर आहेत.. वयाच्या 33 व्या वर्षी निधन झालेले बाळशास्त्री तरूण होते, व्यायामानं शरीर दणकट झालेले होते शिवाय विद्वत्त होते. सोबतच्या वृत्तासोबत बाळशास्त्रींचा फोटो असून तोच अधिकृत फोटो मराठी पत्रकार परिषदेने स्विकारला आहे व त्यास ‘सामना’चे संस्थापक संपादक व झुंजार पत्रकार स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी ‘हेच खरे बाळशास्त्री’ म्हणून संमती दिली आहे. मात्र सरकारी अधिकारी आपल्या प्रशासकीय वापरात बाळशास्त्री जांभेकरांचा दुबळा व वयोवृद्ध वाटावेत असा फोटो वापरतात. अवघे 33 वर्ष जगलेले बाळशास्त्रींचा शासनकर्ते तरुण फोटो प्रसिद्ध करतील तो सुदिन समजावा असेही मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी म्हटले आहे.